बिपरजॉयचा मुंबईच्या वातावरणावर परिणाम, ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिपरजॉय चक्रिवादळाने आता विक्राळ रूप धारण करायला सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम केरळ आणि मुंबईनजीकच्या समुद्रात पाहायला मिळत असून समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. चक्रीवादळामुळे प्रचंड वारा सुटला असून पाऊस पडत आहे.

मुंबईच्या किनारी भागात रविवारी रात्री पाऊस पडला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई,पालघर या जिल्ह्यांसह राज्याच्या अनेक जिल्ह्यात पाऊस पडला आहे. मुंबईतील हवामान विभागाने बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवसात मुंबईसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यात सोमवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच, ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुजरातमधील कांडला बंदराला संपूर्णतः रिकामी करण्यात आलं असून तेथील जहाजांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 15 जूनपर्यंत हे वादळ कच्छवरून पाकिस्तानच्या कराचीच्या दिशेने जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे गुजरात सरकारने एनडीआरएफ आणि एसडीआरफची पथकं किनारी भागात तैनात केली आहेत.