
कर्नाटक राज्यात काँग्रेस सरकारने धर्मांतरणविरोधी कायदा आणि सावरकर, हेडगेवार यांच्यावरील धडे शालेय शिक्षण अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार, तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का?” असा सवाल करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. या टीकेला विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर केले आहे. तुमची महाशक्ती आणि पातशाह सावरकरांना भारतरत्न कधी देणार? असा सवाल अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, “देवेंद्रजी आम्हाला कसला पॅटर्न विचारता? देशभरातील अर्धा डझन राज्यांचे सरकारं मागच्या दाराने पाडण्याचा पॅटर्न तुमच्याच पक्षाने आणला आहे. सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा आता. एवढेच सावरकर प्रेम असेल तर तुमची महाशक्ती आणि पातशाह सावरकरांना भारतरत्न कधी देणार आहेत, हे पण सांगुन टाका!”
देवेंद्रजी आम्हाला कसला पॅटर्न विचारता? देशभरातील अर्धा डझन राज्यांचे सरकारं मागच्या दाराने पाडण्याचा पॅटर्न तुमच्याच पक्षाने आणला आहे. सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा आता. एवढेच सावरकर प्रेम असेल तर तुमची महाशक्ती आणि पातशाह सावरकरांना भारतरत्न कधी देणार…
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 17, 2023
अयोध्या पौळ यांना झालेली मारहाण निंदनीय
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सोशल मीडिया महाराष्ट्र समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शुक्रवारी रात्री कळव्यात भ्याड हल्ला झाला. या हल्ल्यानंतर त्यांच्यावर शाईफेकही झाली. “पौळ यांना ठाणे-कळव्यात झालेली मारहाण अतिशय निंदनीय आहे.” असे मत दानवे यांनी व्यक्त केले. “हा भेकडपणा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आलेख खाली आणणारा आहे. या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची हिंमत आता पोलिसांनी दाखवावी.” असे ते म्हणाले.

























































