
>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक
चौफेर तटबंदी व टेहळणी बुरूज असलेला एक किल्ला पुणे जिह्यातील हिरडस मावळ प्रांतात आहे. भोरजवळ वरंधा घाटमार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष ठेवून असणारा व चोहोबाजूंनी तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर, कमळगड, केंजळगडसारख्या महत्त्वपूर्ण किल्ल्यांनी वेढलेला हा किल्ला म्हणजे किल्ले रोहिडा होय.
रोहिडा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास पुणे-भोर-खानापूर ते गडपायथ्याचे बाजारवाडी गाव असा प्रवास करावा लागतो. बाजारवाडी गावात पोहोचल्यानंतर समोरच सुस्तावून पडलेला अजस्र रोहिडा आपले लक्ष वेधून घेतो. शाळेसमोर गाडी लावून आपण पाण्याच्या टाकीजवळून किल्ल्याकडे जाणाऱया मळलेल्या वाटेला भिडायचे. दोन छोटय़ा टेकडय़ा चढून गेलो की, आपण मुख्य किल्ल्याच्या डोंगराला भिडतो. तासाभरात आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो.
किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार अत्यंत देखणे आहे. गडप्रवेश केल्यानंतर थोडी उभी चढण पार केली की, आपण गडाच्या दुसऱया दरवाजाजवळ येतो. या दुसऱया प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला भिंतीवर गजशिल्प, तर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना शरभशिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत. या देवडींच्या खाली उजव्या हाताला जमिनीच्या पोटात पाण्याचे एक कातळकोरीव टाक आहे. त्या टाक्याला जमिनीवर एक झरोका ठेवलेला आपणास दिसून येतो. गडाच्या प्रवेशद्वारापाशीच असलेले हे पाण्याचे अनोखे टाक पाहून आपण गडाच्या तिसऱया प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. हे प्रवेशद्वार पण अत्यंत देखणे असून दरवाजाच्या दोन्ही बाज्नां उठावदार गजशिल्पे व कमळशिल्पे आहेत. या दरवाजाचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे या दरवाजाच्या डाव्या हाताला मराठी तर उजव्या हाताला फारसी भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखावरून 1656 साली मुहमद आदिलशाहच्या कारकिर्दीत हा तिसरा दरवाजा बांधला गेला. त्या वेळी रोहिडय़ाचा हवालदार विठ्ठल मुदगलराव होता. तिसऱ्या प्रवेशद्वारातून आत आलो की, आपण गडमाथ्यावर दाखल होतो. डावीकडे सदरेची वास्तू तर उजवीकडे तटबंदीमध्येच एक शरभशिल्प आहे. शरभशिल्प असलेल्या तटबंदीच्या पुढे एक टेहळणी बुरूज आहे, तर सदरेच्या मागे रोहिडेश्वराचे मंदिर आहे. रोहिडेश्वर मंदिराच्या पुढे समाधी शिल्पे व एक शिवलिंग आपणास दिसून येते. मंदिराच्या समोर पाण्याचं एक छोटं तर मागे एक मोठं तळं आहे. मंदिराच्या डाव्या हाताला वाडय़ाचे जोते दिसून येते.
रोहिडेश्वराचा परिसर पाहून झाला की, आपण परत सदरेजवळ यायचे. सदरेच्या पुढे मळलेल्या पायवाटेने आपण फत्ते बुरुजाकडे येऊन पोहोचतो. पुढे गडाच्या पिछाडीस जाताना तटबंदीमध्ये एक चोरदरवाजा दिसून येतो. येथून खाली जाणारी वाट आजमितीस वापरात नाही. पुढे डाव्या हाताला पाण्याचे टाक लागते. गडाच्या पिछाडीस लष्करीदृष्टय़ा बळकट असा वाघजाई नावाचा बुरूज आहे. गडाच्या या बाजूला असलेल्या डोंगरावर वाघजाई देवीचे ठाण असल्याने या बुरुजाचे नामकरण ‘वाघजाई बुरूज’ असे करण्यात आले. गडाच्या उत्तरेकडील भागात पाण्याची एक सलग कातळकोरीव टाकी व खांबटाकी आहेत. ही टाकी पाहून पुढे आल्यावर वाटेत चुण्याचा घाणा दिसून येतो. गडावर वाघजाई बुरुजासोबत सर्जा, पाटणे, दामगुडे व लष्करीदृष्टय़ा बळकट असलेला शिरवले बुरूज आहे. शेवटचा शिरवले बुरूज पाहून आपण परत रोहिडेश्वराच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो. अशा रीतीने आपली गडफेरी पूर्ण होते.
आटोपशीर विस्तार, एक सलग तीन दरवाजांची मालिका, दरवाजातील पाण्याच्या टाकीची अनोखी रचना, संपूर्ण माथा वेढणारी तटबंदी, शिरवले, वाघजाईसारखे लढाऊ रचनेचे बुरूज, शिलालेख व शरभशिल्प, गडावरून दिसणाऱया आसपासच्या किल्ल्यांचे विहंगम दर्शन या सर्व दुर्गवैशिष्टय़ांमुळे हा किल्ला आपल्या मनावर एक वेगळीच छाप सोडतो. गडावरून पायउतार होऊन आपण खाली जरी आलो तरी तो गड नजरेच्या आड होईपर्यंत त्याची सुंदर तटबंदी आपला पिच्छा काय सोडत नाही.
गडाचे नामकरण विचित्रगड
निजामशाहीच्या अस्तानंतर आदिलशाही राजवट या गडावर सुरू झाली. रोहिडा किल्ल्याचा ताबा 1656पर्यंत आदिलशहाकडे होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी रोहिडा किल्ला जिंकून घेतला. यात कृष्णाजी बांदल मारले गेले, पण त्यांच्या सैन्यातील बाजीप्रभू देशपांडे यांना शिवरायांनी आपल्या पदरी ठेवले. शिवरायांनी या गडाचे नामकरण ‘विचित्रगड’ असे केले. इंग्रजांच्या काळात रोहिडा किल्ला भोर संस्थानिकांच्या ताब्यात होता.
























































