शेतकऱ्यांचे उत्पन्न नाही पण आत्महत्या डबल झाल्या; शरद पवार यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेती, राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि अन्य प्रश्नांवरून केंद्र आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. सत्ताधारी पक्षाची ताकद जिथे नाही, तिथे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही शरद पवार यांनी राज्य सरकारवर केला आहे.

शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं, तीन वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू. आज 10 वर्ष झाली. अद्यापही शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल झाले नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या डबल झाल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यात 391शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत,असेही ते म्हणाले.

राज्यकर्त्यांची जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवण्याची आहे. पण, आज जाणीवपूर्वक समाजा-समाजामध्ये कटुता कशी निर्माण होईल, याची खबरदारी राज्यकर्त्यांकडून घेतली जात आहे. गेल्या काही महिन्यात कोल्हापूर, संगमनेर, नांदेड, अकोला, अमळनेर येथे जातीय दंगली झाल्या आहेत. महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाची शक्ती जिथे नाही, तिथे जातीय तेढ निर्माण करून त्याचा लाभ राजकीय दृष्टा कसा घेता येईल, हे पाहिलं जातं, असे शरद पवारांनी सांगितले.

महाराष्ट्रात 3 हजार 152 मुली आणि महिलांचा शोध लागत नाही. एवढ्या प्रमाणात मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत. तर, समाजातील भगिनींचे संरक्षण करण्यासाठी आजचे राज्यकर्ते काय करतात, हे गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले. मणिपूरमध्ये गेले 45 दिवस सतत दंगली होत आहेत. चीनच्या सीमेजवळील राज्यात अशाप्रकारची कायदा सुव्यवस्था झाली आहे. त्याचा गैरफायदा शेजारच्या राष्ट्राने घ्यायचे ठरवले तर, देशाची काय परिस्थिती होईल. देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जायचे, तर जावे. पण, याचा बंदोबस्त करावा, अशा शब्दांत शरद पवारांनी बजावले आहे.