भाज्या कडाडल्या; गृहिणींचे बजेट कोलमडले, टोमॅटो 80 रुपयांवर तर कोथिंबिरीची जुडी 50 रुपयांना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाल्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. भाज्यांची आवक घटल्याने दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. महिनाभरापूर्वी 20 रुपये किलो असलेल्या टोमॅटोसाठी आता 80 रुपये मोजावे लागत आहेत. कोथिंबिरीची जुडी 30 रुपयांवरून 50 रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, लिंबाचे दर मात्र घटले असून 500 ते 600 रुपये शेकडावरून 200 रुपयांवर पोहोचले आहेत.
यंदा पावसाला उशीर झाल्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचा फटका बसला. शेतीलादेखील पाणी उपलब्ध होत नसल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाज्यांचे दर कडाडले आहेत. काही दिवसांपूर्वी 20 ते 25 रुपये किलोने मिळणाऱया टोमॅटोसाठी ग्राहकांना सध्या 80 रुपये मोजावे लागत आहेत. 20 ते 25 रुपयांना मिळणारी मेथीची जुडी आता 35 रुपयांवर पोहोचली आहे. दोडक्याचे भाव 80 रुपये प्रतिकिलो असून भेंडी आणि वांग्यासाठी ग्राहकांना 60 रुपये मोजावे लागत आहेत. वाटाणा 60 रुपयांवरून 100 रुपयांवर तर शिमला मिरचीचे दर 60 वरून 80 रुपयांवर पोहोचले आहेत, अशी माहिती प्रभादेवी भाजी मंडईतील विव्रेते सूर्यकांत पंदरपळे यांनी दिली.