विंडीजचा गेम ओव्हर वर्ल्ड कप पात्रता फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग दोनदा क्रिकेटचा जगज्जेता ठरलेल्या विंडीजचा नेदरलॅण्ड्सविरुद्धच्या सुपर ओव्हर पराभवामुळे वन डे वर्ल्ड कप पात्रता फेरीत गेम ओव्हर झाला आहे. विंडीजने 375 धावांचे जबरदस्त आव्हान दिल्यानंतरही नेदरलॅण्ड्सने त्या धावांचा पाठलाग केला. शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी असताना लोगन वॅन बीक बाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये वॅन बीकने होल्डरच्या सलग सहा चेंडूंवर (4,6,4,6,6,4) चौकार-षटकारांची बरसात करीत 30 धावा चोपल्या आणि मग वॅन बीकनेच जॉन्सन चार्ल्स आणि रोमारिओ शेफर्डला बाद करून विंडीजला फक्त आठ धावा करू दिल्या आणि आयसीसी वर्ल्ड कप पात्रता फेरीत सुपर ओव्हरमध्ये सुपर्ब विजयाची नोंद केली.

सुपर ओव्हर आधी वेस्ट इंडीजने निकोलस पूरनने 6 षटकार आणि 9 चौकारांसह 65 चेंडूंत केलेल्या नाबाद 104 धावा आणि ब्रॅण्डन किंग (76), जॉन्सन चार्ल्स (54), शाय होप (47) आणि किमो पॉल (ना. 46) यांच्या साथीमुळे 6 बाद 374 असा धावांचा डोंगर उभारला होता. पण तेजा निदामनुरू (111) आणि स्कॉट एडवर्ड्स (67) यांनी केलेली 143 धावांची भागी आणि शेवटी तेजा-बीकने 21 चेंडूंत ठोकलेल्या 44 धावांमुळे नेदरलॅण्ड्सने अनपेक्षितपणे सामना बरोबरीत सोडवला.

झिम्बाब्वेचा त्रिशतकी विजय
सीन विल्यम्सच्या 174 धावांच्या जोरावर अमेरिकेविरुद्ध 6 बाद 408 असा धावांचा हिमालय रचला होता. विल्यम्सने 101 चेंडूंत 174 धावा केल्या तर सलामीवीर जॉयलॉर्ड गम्बीने 103 चेंडूंत 78 धावा केल्या. त्यानंतर अमेरिकेचा डाव 25.1 षटकांत 104 धावांतच गुंडाळून झिम्बाब्वेने एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील दुसऱया त्रिशतकी विजयाची नोंद केली. त्यांनी 304 धावांनी विजय मिळविला.

विंडीजला चमत्काराची गरज
विंडीजचा संघ सुपर सिक्समध्ये पोहोचला असला तरी अ गटातून सरस ठरलेल्या झिम्बाब्वे आणि नेदरलॅण्ड्सविरुद्ध ते हरले आहेत. झिम्बाब्वेने दोन्ही संघांना साखळीत हरवल्यामुळे ते सुपर सिक्समध्ये चार गुणांसह पोहोचले आहेत. ब गटातूनही श्रीलंका किंवा स्कॉटलंडपैकी एक संघ चार गुणांसह सुपर सिक्समध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे चार गुण मिळवणारा संघ एक सामना जिंकताच वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे झिम्बाब्वे आणि श्रीलंकेला वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याची अधिक संधी आहे. तर विंडीजला केवळ चमत्कारच हिंदुस्थानमधील वर्ल्ड कपसाठी पोहोचवू शकतो. त्यांना सुपर सिक्सच्या तिन्ही लढती जिंकाव्या लागतीलच, बरोबर झिम्बाब्वे आणि नेदरलॅण्ड्सला तिन्ही सामन्यांत हरण्याची वाट पाहावी लागेल. असं घडलं तरच विंडीज पात्र होईल, पण सध्या हे अशक्य वाटतेय.