पोलीस डायरी – वरिष्ठ अधिकारीच वाकलेत, पोलीस ठाण्यात ‘चायनीज’ फौजदारांचा सुळसुळाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिन्यात मुंबई पोलीस दलात 7 हजार 76 पोलीस शिपायांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी चायनीज तंत्रज्ञानाचा वापर करून काही उमेदवारांनी कॉपी केल्याचे उघड झाल्यानंतर दोन डझनपेक्षाही अधिक उमेदवारांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या तंत्रज्ञानाचा खरा सूत्रधार कोण, याचा अद्याप शोध लागलेला नाही. हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करण्यात आल्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

7 हजार पदांसाठी 5 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील 2 लाख उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. त्यातून आणखी छाननी होऊन 83 हजार उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा 7 मे रोजी मुंबईतील शाळा-कॉलेजच्या 215 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही परीक्षा सुरू असतानाच भांडुप, गोरेगाव, मेघवाडी, कस्तुरबा मार्ग (बोरिवली), दहिसर या परिसरात परीक्षा केंद्रातील काही उमेदवार प्रश्नपत्रिकेकडे न पाहता केवळ उत्तरे लिहीत असल्याचे देखरेख ठेवणाऱया सुपरवायझरच्या लक्षात आले. त्यांना संशय आला. त्यांनी उत्तर लिहिणाऱया एका उमेदवाराच्या कपडय़ाची झडती घेतली असता त्याच्या अंगावरील कपडय़ावर क्रेडिट कार्डच्या आकाराचे एक कार्ड, एक बटण पॅमेरा व कानात खोलवर इलेक्ट्रिक एअरबर्ड आढळून आले. परीक्षा केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने उमेदवारांनी या चायनीज तंत्रज्ञानाचा कॉपीसाठी वापर केला होता.

परीक्षा केंद्रात क्रेडिट-डेबिट कार्ड नेण्यास बंदी नव्हती. त्यामुळे क्रेडिट- डेबिटसारख्या दिसणाऱया कार्डमध्ये उमेदवारांनी ‘सिम’ बसविले व कानामध्ये कुणाला दिसणार नाही असे काळी मिरीच्या दाण्यासारखे इलेक्ट्रिक एअरबर्ड बसविले. या तंत्राद्वारे प्रश्नपत्रिका कुठेतरी कोसो मैल दूर असलेल्या कुशल तंत्रज्ञाला पाठविण्यात आली. ती व्यक्ती त्या उमेदवाराला समोरून प्रश्नांची उत्तरे सांगत होती व परीक्षार्थी उमेदवार लिहीत होता. हा सर्व संशयास्पद प्रकार पर्यवेक्षकाच्या लक्षात आल्यावर ‘कॉपी’ करण्याचे चायनीज तंत्रज्ञान मुंबईतील 5 ठिकाणी उघडकीस आले. दोन डझन उमेदवारांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या उमेदवारांकडून आपण 10 ते 15 लाख रुपये एका प्रश्नपत्रिकेची उत्तरे मिळविण्यासाठी मध्यस्थाला दिल्याची माहिती पोलिसांना उमेदवारांच्या कबुलीतून मिळाली. त्यासाठी ‘चायनीज अॅप’ परीक्षा केंद्रात कसे वापरायचे, तोंडातून शब्द न काढता, न बोलता समोरच्या व्यक्तीला कनेक्ट होऊन गुपचूप मान खाली घालून उत्तरे कशी लिहायची याचे प्रात्यक्षिक परीक्षेपूर्वी उमेदवारांना देण्यात आले होते. अशा पन्नासेक उमेदवारांना तपास अधिकाऱयांनी ओळखले (Identified) असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. त्यासाठी मुंबईतील पाच उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. चायनीज तंत्रज्ञानाचा वापर करताना परीक्षा केंद्रावरच उमेदवार पकडले गेल्याने पोलीस शिपाई भरतीचा निकाल अद्याप लागलेला नाही. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे गुणवत्ता व मेहनत करून उत्तीर्ण होण्याची 100 टक्के खात्री असलेल्या तरुणांमध्ये नैराश्य पसरले आहे.

चायनीज तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करून परीक्षेत उत्तीर्ण झालेले हजारो तरुण आज शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अथवा शासनातर्फे ज्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये नवनवीन तंत्राचा वापर करून भ्रष्ट तरुणांना भरती केले जाते. यात बऱयाच टोळय़ा वर्षानुवर्षे गुंतल्या आहेत. बीड, जालना, संभाजीनगर येथील एक टोळी गेल्या महिन्याच्या पोलीस शिपाई भरतीमध्ये गुंतली असल्याचे व पोलिसांनी त्याचा सूत्रधार ओळखला असल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हा लाखो रुपये खर्च करून, कॉपी करून उत्तीर्ण होणाऱया व शासकीय सेवेत अधिकारी व कर्मचारी पदावर रुजू झालेल्या भ्रष्ट तरुणांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार?

मध्यंतरी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेले बरेच फौजदार एकामागून एक असे लाच घेताना पकडले जात होते. अगदी ‘प्रोबेशनरी’ (परिविक्षाधीन) काळात फौजदार ‘ट्रप’ होत होते. अशा फौजदारांची त्या वेळी ‘चायनीज बॅच’ अशी ओळख झाली होती. कुणी ट्रप झाला की, पोलीस दलात ठामपणे बोलले जायचे, तो ‘चायनीज बॅच’मधलाच असणार! त्यामुळे गेल्या महिन्यात उघडकीस आलेले चायनीज तंत्रज्ञान हे नवीन नाही ते जुनेच आहे. फक्त ते उशिरा उघडकीस आले आहे. हीच ‘चायनीज बॅच’ आज एपीआय, पीआय म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात आज कार्यरत आहे. पोलीस दलात म्हणा पिंवा शासनाच्या कोणत्याही खात्यात प्रामाणिकपणे काम करणारे गुणवंत अधिकारी व कर्मचारी फार कमी आहेत. एका कनिष्ठ शासकीय अधिकाऱयाला पिंवा फौजदाराला आज किमान लाख-पाऊण लाख रुपये दरमहा पगार मिळतो तरीही भ्रष्ट अधिकारी पैशासाठी लोकांच्या मागे लागतात आणि ट्रप होतात. नुकताच फौजदार म्हणून चार्ज घेतल्यावर संभाजीनगरमधील एका अधिकाऱयाचे त्याच्या हितचिंतकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, परंतु तोच फौजदार दुसऱया दिवशी लाच घेताना पकडला गेला. म्हणजे भ्रष्टाचार किती नसानसांत भिनला आहे. ते कॉप्या करून, पैसे देऊन नोकऱया मिळवत आहेत व गुणवंत, प्रामाणिक तरुणांवर अन्याय करीत आहेत.

‘खोके’ देऊनच राजकीय पुढारी सत्तेवर आले असतील तर त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? राजकीय पुढारी व त्यांचे मध्यस्थ बदल्यांसाठी लाखो रुपये उकळतात, हवी ती पोस्टिंग देतात व त्यांना हवे तसे वाकवतात. सध्या महाराष्ट्रभर तेच सुरू आहे. खोटय़ाचे खरे करायचे व खऱयाचे खोटे ठरवून कारवाई केली जात आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी राजकीय पुढाऱयांपुढे, सत्ताधाऱयांपुढे इतके झुकलेले, दबलेले कुणीही कधी पाहिलेले नव्हते. त्यामुळेच सर्वत्र ‘चायनीज बॅच’चा सुळसुळाट वाढला आहे, त्यांच्यापासून सावधान! तुम्ही सत्ताधाऱयांशी संबंधित असाल तर तुमचे कुणी वाकडे करू शकणार नाही, परंतु तुम्ही निःपक्षपाती विरोधक असाल तर तुमच्यावर कोणती वेळ येईल ते सांगणे कठीण आहे. तुमच्यावर पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ येऊ नये इतकेच! कारण पोलिसांनी ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ला तिलांजली दिली आहे!