फोनचा बहाणा करून मोबाईल लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नातेवाईकांना तातडीने फोन करायचा आहे असे सांगून तरुणाचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी दोघांना बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. राजनारायण विश्वकर्मा आणि सुनीता राजभर अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

तक्रारदार हे नवी मुंबईत राहत असून ते सेल्समनचे काम करतात. एप्रिल महिन्यात ते कामानिमित्त गोरेगाव रेल्वे स्थानक येथे आले होते. फलाट क्रमांक 1 हून जात असताना दोघांनी त्याचा पाठलाग केला. त्या दोघांनी त्याच्याकडे वारंवार खाद्यपदार्थाची मागणी केली. त्याने त्या दोघांना गोरेगाव पूर्व येथे नेले. तेथे वडापाव खाल्यावर ते पुन्हा फलाट क्रमांक 1 येथे आले. त्यानंतर त्या दोघांना तहान लागल्याने ते पुन्हा लिंबूपाणी आणण्यासाठी गेले. तेव्हा एकाने त्याच्याकडे नातेवाईकांना तातडीने फोन करायचा असल्याचे भासवले. त्यावर विश्वास ठेवून त्याने मोबाईल दिला. काही वेळाने तक्रारदार तेथे आले. तेव्हा तो तेथे नव्हता.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एकाची माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी सुनीताला, त्यानंतर राजनारायणला ताब्यात घेऊन अटक केली. या गुह्यात एकजण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.