
>> निर्गुण निराकार
प्रत्येकाचं ते मन शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही भलाबुरा विचार करत असतं. मात्र काही काही आत्मे किंवा मन व शरीर सर्वांहून आगळे वागताना आपण सगळेच पाहतो आणि अशाच लोकांना आपण चमत्कारिक किंवा विक्षिप्त असं म्हणून निकालात काढतो, पण अशाच लोकांना भेटणं हा माझा छंद आहे. जरा भारदस्त नाव द्यायचं तर शौक आहे. या छंदापायी भेट घडली ती ‘निर्गुण निराकार’ अशा बभृवाहन सत्यनारायण चवंडा या नावाच्या अवलियाशी.
परमेश्वर जेव्हा प्रत्येक मानव घडवून पृथ्वीतलावर पाठवतो तेव्हा त्यात हाडं आणि मांस असतं, बाकी इंद्रिये असतात आणि आजपर्यंत शास्त्राने सिद्ध न झालेला एक अतर्क्य असा भाग असतो त्याला मन म्हणा किंवा आत्मा म्हणा, तो असतो. प्रत्येकाचं ते मन शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही भलाबुरा विचार करत असतं. मात्र काही काही आत्मे किंवा मन व शरीर सर्वांहून आगळे वागताना आपण सगळेच पाहतो आणि अशाच लोकांना आपण चमत्कारिक किंवा विक्षिप्त असं म्हणून निकालात काढतो, पण अशाच लोकांना भेटणं हा माझा छंद आहे. जरा भारदस्त नाव द्यायचं तर शौक आहे. माझे सगळे मित्र म्हणतात की, मी कारण नसताना अशा अवलियांना मुद्दाम भेटतो, पण तसं नाहीये हो! बभृवाहन सत्यनारायण चवंडा या नावाच्या माणसाला मी का भेटेन? पण भेटलो. झालं असं की, थेंब थेंब पाऊस पडणाऱया शहरात माझा एक प्रयोग होता. प्रयोग खुल्या नाटय़गृहात होता आणि तोही चक्क दुपारी होता. का होता देव जाणे. असे भयानक प्रयोग आम्ही केले आहेत. मे महिन्यात दुपारी साडेबारा वाजता नवीन बांधल्या जाणाऱया धरणावरील मजुरांना मनोरंजन हवं म्हणून तो प्रयोग होता. प्रयोगाचा बट्टय़ाबोळ झाला हे वेगळं सांगायला नकोच. प्रयोगानंतर आम्ही आमची वेशभूषा पिळून काढली. असो, तर दुपारच्या प्रयोगाला निघणार नेमका तेव्हाच तासभर आधी भरघोस (द्राक्षाचे गुच्छ असतात तसा) पाऊस झाला.मैदानात नुसता चिखल झाला होता. प्रयोग रद्द हे ओघाने ठरलं. आता काय करायचं? एका मित्राने मला त्या बभृवाहनच्या दुकानात नेलं. का नेलं? या प्रश्नाला उत्तर नाही. ‘मागाल ते मिळेल’ असं विचित्र नाव त्या दुकानाच्या पाटीवर लिहिलेलं होतं.
दुकान शहरात भररस्त्यावर. त्यामुळे कायम गर्दी दुकानात नाही, तर त्या हमरस्त्यावर. रोज साधारण पन्नास हजारांच्या आसपास लोक जात येत असावेत. कधी खरेदी करायला संपूर्ण कुटुंब असतं, तर कधी नवविवाहित असतात. काही वेळा लग्नाला 5-10 वर्षे लोटून गेलेले आणि कौटुंबिक वादविवाद आणि अबोला किंवा रुसवा याच्या पलीकडे गेलेलेही असतात. अर्थात अशी गिऱ्हाईके आणि भावनांचा कल्लोळ वगैरे दुकान उघडं असेल तर घडतात.
आजूबाजूची दुकानं 9 वाजता उघडतात पण बभ्या – बभृवाहन- याच नावाने ओळखला जातो, मात्र अकराच्यानंतर दुकानात अवतरतो. दुकानाच्या वर असलेल्या घरात तो राहतो. मुलं कॉलेजात असतात. बायको ऑफिसात गेलेली असते.घरी त्याचं सगळं काढून ठेवलेलं असतं. चहा, सकाळचं खाणं, ताजे कपडे, टॉवेल आणि दुकानाच्या किल्ल्या. सगळं आटोपून तो साधारण अकराच्या सुमारास खाली उतरतो. समोरच्या दुकानात जाऊन एक कडक चहा पितो. रेंगाळत येऊन दुकान उघडतो. दुकानातला नोकर येऊन तासभर झालेला असतो. दुकान उघडून दोघे आत जातात. बभ्या शब्दकोडं सोडवायला घेतो. त्या सुमारास जर कोणी गिऱहाईक आलंच तर त्याच्या कपाळावर आठय़ा चढतात. नोकरच काय ते बघतो आणि बभ्या पुन्हा आपल्या कोडय़ात गुंग होतो. तोपर्यंत साडेबारा वाजतात, पण सव्वाबाराच्या सुमारास बभ्या दुकान बंद करायच्या तयारीला लागतो. अगदी ठोक्याला दुकान बंद करून वर घरी जातो. ठेवलेलं जेवण गरम करणारी कामवाली बाई आलेली असते. गरमागरम जेवून मस्तपैकी पंखा लावून (आता म्हणे घराची खोली वातानुकूलित केलेली आहे) तो तीनपर्यंत झोप काढतो. खाली उतरून दुकान उघडतो आणि काही न करता नुसता बसून राहतो. संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत जी काय पी होते ती होते. त्या तमाम पीचा साधारण दोन मिनिटांत हिशोब होतो. मग बभ्या फिरायला जातो. तास-दीड तास जोरजोरात पळतो आणि घरी येऊन लगेच नऊ वाजता माफक जेवून खाली उतरतो.साधारण असाच दिपाम असलेले काही लोक तिथे जमतात. अशा एका पानाच्या दुकानासमोर तो गप्पा मारतो आणि रात्री बाराच्या सुमारास बदामाचे आटीव दूध पिऊन तो घामाघूम होईपर्यंत चालून घरी जातो आणि देह लोटतो. पुन्हा पहाटे चार वाजता उठून तासभर पळतो आणि झोपतो तो नऊ वाजता सकाळी उठतो. पुढचा दिपाम तुम्ही वाचलाच असेल.
“असं कसं जगू शकतोस तू?”
या प्रश्नावर त्याचं उत्तर छान होतं.
“मागच्या पिढय़ांनी भरपूर पैसे व्याजी लावले होते. आज त्याचं व्याज येतंच, दोन लाखांच्या आसपास. आपल्याला फार काही खर्च नाही. त्यामुळे पैसे पुन्हा गुंतवले. रिकामा बसून राहिलो तर कसलं तरी व्यसन लागू शकतं म्हणून नावाला दुकान चालू ठेवलंय.”
असाच एकदा तो दुपारी बाराच्या सुमारास दुकान बंद करायच्या तजविजीत असताना एक माणूस दुकानात आला. बभ्याच्या कपाळावर आठय़ांचं जाळं पसरायला लागलं.
“काय पाहिजे?” बभ्याने अत्यंत निरुत्साही आवाजात विचारलं.
“जनरल नॉलेजचं पुस्तक आहे?” माणसानं विचारलं.
“काय पाहिजे?” बभ्या.
“जनरल नॉलेजचं पुस्तक.”
“काय पाहिजे?” थंड आवाजात पुन्हा बभ्याने विचारलं.
“ऐकू कमी येतं का? जनरल नॉलेजचं पुस्तक पाहिजे.” माणसाचा आवाज जरा वरच्या पट्टीत गेला.
“खणखणीत ऐकू येतं. मैलावरून कोकिळा ओरडली तरी निखळ समजतं.”
“मग मी कोकलून विचारतोय, जनरल नॉलेजचं पुस्तक आहे का? ते ऐकू येत नाहीये का?”
“येतंय हो, पण ते पुस्तक वरच्या फळीवर आहे. एखाद्या माहितीसाठी अख्खं पुस्तक कशाला काढायला लावताय? माझं जनरल नॉलेज उत्तम आहे. माहिती हवी असेल इथे तोंडावर देतो. दुकान बंद करायच्या वेळेवर येताच कशाला?” बभ्याने त्या माणसाकडे न बघताच त्याला सुनावलं.
“ अहो! पण इथेच दुकानाच्या वरच राहता ना तुम्ही?”
“हो! बरोबर आहे, पण तरी ते अगदी कमी असलं तरी अंतर आहेच ना?” बर्फाची लादी डोक्यावर असल्यागत बभ्या उत्तरला.
गिऱ्हाईक तणतणत निघून गेलं.
“दिलं असतंस काढून त्याला पुस्तक तर काय बिघडलं असतं. धंदा झाला असता ना?” मी त्याला विचारलं.
“द्यायला काय कठीण आहे का? आणि मला काय तोशीस लागणार होती. नोकराने दिलं असतं वर चढून.”
“मग?”
“ते वर दिसतंय ना, ते नुस्तं कव्हर आहे. आत पुस्तक नाहीच आहे.” मंद स्मित करत बभ्या म्हणाला.
“चला! आज जेवायला या माझ्या बरोबर फणसाची भाजी आहे. बायको मटणासारखा करते फणस आणि मस्त गावचा हापूसचा रस आहे. चला!”
या बभ्यामुळे ‘निर्गुण निराकार’ म्हणजे काय त्याचा अर्थ मला कळला.
ताजी बातमी- बभ्याच्या मुलाने नोकरी सोडून दुकान चालवायला घेतले आहे. तोंडात साखर असल्यासारख्या बोलण्याने तुफान पी होते. बभ्या मात्र दुकानाच्या बाहेर खुर्ची टाकून मख्ख चेहरा करून बसलेला असतो.
[email protected]






























































