दखल – अविस्मरणीय स्मरणरंजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अस्मिता येंडे

शाळेशी निगडित प्रत्येकाच्या निरनिराळ्या आठवणी, किस्से असतात. लेखक रविकिरण पराडकर लिखित ‘ कृतज्ञ मी’ हा ललित लेखसंग्रह वाचला आणि  माझे मनही शाळेच्या बाकावर कधी विराजमान झाले कळले नाही. शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज आपण जे काही आहोत, ते आपल्या शाळेतील संस्कारक्षम शिकवणीमुळे याची जाणीव ठेवून आपल्या शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या शुद्ध भावनेने लेखकाने हा लेखन प्रपंच केलेला आहे. या आठवणी आहेत 62 – 74 या काळातील. ओघवती आणि प्रवाही प्रथम पुरुषी निवेदन शैली, नीटनेटकी रचना, कथन करण्याची रंजक पद्धती आणि विषयाची सुयोग्य मांडणी यामुळे हे पुस्तक प्रत्येकाला मनापासून भावतं. लेखकाचे शिक्षण कोल्हापुरातील न्यू हायस्कूल, पेटाळा शाखेतील शाळेत पूर्ण झाले. या शाळेतील त्यांचा प्रवेश, नवीन वर्ग, शाळेचा परिसर, मैदान, या वास्तूची रचना, तेथील खिडक्या, प्रवेशद्वार इ. लेखकाने आपल्या शब्दातून शाळेची वास्तू  डोळ्यांसमोर उभी केली आहे.

लेखकाने आपल्या शाळेचा सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक विकास तसेच तेव्हाचे शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेचे वर्णन केलेले आहे. मैदानी खेळ खेळतानाची मजा, मधल्या सुट्टीतील धमाल, एकमेकांना सहाय्य करणं तसेच लेखकातील खोडकरपणा, मिश्कील वृत्ती, हजरजबाबीपणा याची प्रचीती देणारे अनेक किस्सेसुद्धा रंजक आहेत. काही किस्से आपल्याला हसवतात तर काही आठवणी डोळ्यात अश्रू आणतात. या पुस्तकात दुसऱया भागात लेखकाने आपल्या गुरुजनांना शब्दरूपी आदरांजली दिलेली आहे. आपल्याला शिकवणारे शिक्षक,  त्यांनी लावलेले वळण, चांगल्या कामाचे कौतुक, वेळप्रसंगी कठोर होऊन केलेली शिक्षा यामुळे आपले व्यक्तिमत्त्व घडले असे ते लिहीतात.  त्यांनी आपल्या गुरुजनांवरील लिहिलेले लेख हृदयस्पर्शी आहेत.

आपल्या शाळेप्रति असणारी त्यांची भावना, आपलेपणा आणि या ऋणातून उतराई होण्याचा लहानसा प्रयत्न म्हणून लेखकाने ‘कृतज्ञ मी’ म्हणत आपली भावना व्यक्त केली आहे,  पेटाळ्यातला गोतावळा’ अनुभवण्यासाठी ही आठवणींची शाळा नक्की अनुभवा.