
पंढरपूरवर मोगलांची अनेक आक्रमणं झाली पण बडव्यांनी कधीही विठ्ठलाची साथ सोडली नाही. हा इतिहास असताना राजकीय मंडळी बडव्यांच्या नावाने नको ते खापर फोडून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत. यापुढे बडव्यांच्या नावाने शंख करणाऱ्या गद्दारांनी बडव्यांच्या नावाचा वापर किंवा खोटी उदाहरणे दिल्यास, “त्या” राजकीय पळपुट्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ असा निर्वाणीचा इशारा संपूर्ण बडवे समाजाने दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतेही अनैतिक राजकीय घडामोडी घडली की त्याचा संदर्भ पंढरपूरच्या बडवे आणि विठ्ठलाशी जोडला जातो. बडवे आणि विठ्ठल यांचे संबंध हे राजकीय नव्हते ते श्रद्धा आणि भक्तिशी निगडीत आहेत. स्वतः च्या जीवाची पर्वा न करता बडव्यांनी श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण केले आहे. औरंगजेब, अफजलखान जेव्हा पंढरपूरवर चाल करुन आला तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून बडव्यांनी देवाच्या मूर्तीचे संरक्षण केले आहे. बडवे पळपुटे किंव्हा गद्दार असते तर मूर्ती सोडून पळून गेले असते. मात्र संकट काळात देवाला सोडून न जाता देवाच्या रक्षण केले. हा खरा इतिहास असताना कोणतेही भ्रष्ट राजकीय घडामोड झाली की विठ्ठलाभोवतीचे बडवे होते म्हणून आम्ही बाहेर पडलो अशी सारवासारव राजकीय नेत्यांकडून केली जात असते.
शरद पवार यांना सोडून अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी आपली वेगळी राजकीय चूल मांडली. या राजकीय घडामोडीची बाजू मांडताना भुजबळ यांनी पवारांना बडव्यांनी घेरले आहे म्हणून आम्ही बाहेर पडलो असे स्पष्टीकरण दिले होते. भुजबळ यांच्या वक्तव्याने समस्त बडवे समाज संतप्त झाला असून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात असे प्रकार घडत असतात. या राजकीय घडामोडींशी बडवे आणि विठ्ठल यांचा कसलाही अर्थाअर्थी संबंध नाही. पण उगाच खोटी उदाहरणे जोडून बडव्यांना बदनाम करण्याचे काम काही राजकीय नेत्यांकडून होत असते. बडवे समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र सर्वच राजकीय पक्षांनी तातडीने थांबवावे. तसेच विठ्ठल आणि बडवे असे उदाहरण कोणी दिल्याचे दिसल्यास त्या पक्षाला आणि त्या नेत्यांना समस्त बडवे समाज त्याच भाषेत उत्तर देईल असा निर्वाणीचा इशारा अतुल बडवे यांनी दिला आहे. या विषयाबाबत बडवे समाजातील युवकांची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.























































