
राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही भाजपसोबत गेलो होतो. भाजपसोबत जाऊन चूक केली असे आता म्हणून काय उपयोग? आम्हाला आता ही चूक दुरुस्त करावी लागणार आहे. वेळ येईल तेव्हा आम्ही ही चूक दुरुस्त करू. राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्याने आपला पक्ष मोठा होईल, असे त्यांना वाटत असेल, मात्र यामुळे ते पण गोत्यात सापडणार, असा सूचक इशारा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला.
पहिल्याला मारायचं आणि दुसऱयाला हाती घ्यायचं, दुसऱयाला मारून तिसऱयाला हाती घ्यायचं. हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आपली सत्ता आणि पक्ष वाढवताना दुसऱयाचं मरण होऊ नये, याची काळजी सगळय़ांनीच घ्यायला हवी. एखाद्यानं किती वेळ थांबायचं? किती सहन करायचं? जर मर्यादा तुटल्या तर कोणीच कुणाचं राहणार नाही, असे कडू म्हणाले.




























































