साधीसोपी रंजक कथा पंचायत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>तरंग वैद्य

मध्य प्रदेशातील फुलेरा या छोटय़ाशा गावात पंचायत सचिव म्हणून इंजिनीअरिंगची डिग्री घेतलेल्या एका तरुणाची, अभिषेकची नेमणूक होते. गावच्या जीवनशैलीबाबत अनभिज्ञ असलेल्या अभिषेकला शासकीय कर्मचारी आणि एक माणूस म्हणून ग्रामीण जीवनशैली, तिथल्या समस्यांचा येणारा अनुभव साध्यासोप्या, पण मनोरंजक पद्धतीने मांडणारी वेबसीरिज पंचायत.

आपल्या देशात पूर्वापार चालत आलेली व्यवस्था म्हणजे पंचायत व्यवस्था. प्रत्येक गावाची एक पंचायत असते ज्याचे सदस्य आपल्या गावाची सर्व व्यवस्था बघतात, काळजी घेतात. पंचायत शासन व्यवस्थेचा पाया असल्यामुळे शासनातर्फे एका कर्मचाऱयाची नेमणूक केली जाते. ज्याला पंचायत सचिव म्हटले जाते. शहरातील लोकांना याबद्दल खूप कमी माहिती आहे. म्हणून दोन ओळीत थोडी कल्पना दिली. सविस्तर आपण ‘पंचायत’ नावाच्या वेबसीरिजमध्ये बघूया.

एप्रिल 2020 मध्ये ‘पंचायत’ ही वेबसीरिज आली. या मालिकेचा पहिला सीझन लोकांनी अक्षरश उचलून धरला आणि म्हणूनच मे 2022 मध्ये ‘सीझन-2’ही आला. एखाद्या व्यवस्थेबद्दलची माहिती अतिशय साध्यासोप्या, पण मनोरंजक पद्धतीने यात प्रस्तुत केली आहे. मध्य प्रदेशमधील सिहोर जिह्यातील एका गावात याचे चित्रीकरण केले गेले आहे. जे आहे, जसे आहे अगदी तसेच केले आहे. कमी जास्त अजिबात नाही. त्यामुळे ते अगदी वास्तविक वाटते (वास्तविक आहेच) आणि मनाला भिडते.

इंजिनीअरिंगची डिग्री घेतलेल्या तरुणाला (अभिषेक) त्याच्या शिक्षणाच्या मानाने कमी पगाराची, परंतु सरकारी नोकरी फुलेरा या छोटय़ाशा गावात पंचायत सचिव म्हणून मिळते. गावात भरपूर वेळ मिळेल व तिथे राहून शांतपणे उच्च शिक्षणाची आणि व्यावसायिक परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करता येईल तसेच पगारही मिळेल या विचाराने हा तरुण नोकरी स्वीकारतो. गावात आल्यावर त्याला शहरी आणि गावच्या जीवनशैलीतील तफावत जाणवते. शहरात बहुतेक सर्व काही चुटकीसरशी उपलब्ध होत असते. पण गावात खऱया अर्थाने आत्मनिर्भर राहावे लागत असल्याचे त्याला समजते. जेवण बनवण्यापासून कपडे धुण्यापर्यंत सर्व काही स्वतच करायचे. गावातील एक तरुण त्याला सहाय्यक म्हणून असतो. त्याच्या सहाय्याने आणि सरपंचाच्या संमतीने तो आपली कामे सांभाळत अभ्यासही करतो. चार ओळीत साधीसोपी पण रंजक अशी ही कथा.

गावातील लोकांचे स्वभाव, त्यांची जगण्याची पद्धत, त्यांचा दृष्टिकोन या सर्व बाबींचे तपशीलवार चित्रीकरण करीत गोष्ट पुढे जाते. स्वतचा अभ्यास, गावातील राजकारण, उच्च अधिकाऱयांचे दौरे हे सगळे सांभाळताना अभिषेकच्या लक्षात येते की, जे काम तो सोपे समजत होता ते तेवढे अजिबात सोपे नाही. वर त्याच्या खांद्यावर एक जबाबदारीही आहे.

गावात लहान का होईना, पण समस्या असतातच. त्यांचे निवारण, शासकीय योजनांची अंमलबजावणी, अंधविश्वास या सर्व मुद्दय़ांवर सोप्या, पण मार्मिक पद्धतीने भाष्य केले आहे. काही ठिकाणी व्यंगात्मक शैलीचा वापर केलाय. विचारपूर्वक लिहिलेले खुसखुशीत संवाद दृश्यांना अधिक मजबुती देऊन जातात. गावातील रस्त्यांची अवस्था, वेळी-अवेळी बत्ती गुल होणे (लाइट जाणे) यासारखी दृश्ये आपल्या देशातील गावांचे चित्र अगदी स्पष्टरीत्या दाखवून देतात आणि लक्षात येते की, आपल्याला अजून बरीच प्रगती करायची आहे.

रघुवीर यादव, नीना गुप्तासारखे दिग्गज आणि अनुभवी कलाकार असल्यामुळे या वेबसीरिजचे वजन नक्कीच वाढले आहे. दोघांच्या अभिनयातील सहजतेमुळे कथा प्रभावीपणे पुढे जाते. रघुवीर यादव यांची भाषा, देहबोली मन जिंकून घेते. नीना गुप्ताचा अभिनयही तेवढय़ाच ताकदीचा आहे. मालिकेचा संपूर्ण डोलारा मुख्य पात्राच्या खांद्यावर म्हणजेच पंचायत सचिव अभिषेकच्या खांद्यावर असल्याचे जितेंद्र कुमार या अभिनेत्याने दाखवून दिले आहे की, त्याचे खांदे मजबूत आहेत. जितेंद्र कुमार वेब सीरिज विश्वातला जुना कलाकार आहे. वेब सीरिज संकल्पना जेव्हा आपल्या बाल्यावस्थेत होती तेव्हा त्याची ‘पर्मनंट रूममेट्स’ ही मालिका खूप गाजली होती. आज जितेंद्र कुमार हे वेब विश्वातील मोठे नाव आहे आणि आता त्याने काही हिंदी सिनेमेही केले आहेत. आणखी एक उल्लेखनीय नाव आहे अभिषेकच्या सहाय्यकाच्या भूमिकेतला चंदन रॉय या अभिनेत्याचे. तो ‘फुलेरा’ गावातच जन्मलाय आणि तिथेच वाढलाय एवढा खरा वाटतो.

2020ला ‘पंचायत’ अॅमेझॉन प्राईमवर प्रसारित झाली. शहरातील धकाधकीचे आणि घडाळ्याच्या काटय़ावरचे जीवन जगणाऱयांना गावातील संथ, शांत जीवनशैली बघण्यात खूप रस वाटला, मालिका यशस्वी ठरली आणि 2022 ला दुसरा सीझन आला. साधारण अर्धा तास अवधी असलेले पहिले आठ आणि पुढचे आठ असे एकूण सोळा भाग आहेत. परवाच नीना गुप्ता यांनी भाग 3 च्या चित्रीकरणाच्या वेळचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. म्हणजे लवकरच आपल्याला तिसरा भाग बघायला मिळणार असल्यामुळे पहिले दोन भाग बघितले नसल्यास बघून घ्या आणि तिसरा भाग बघण्यासाठी सज्ज व्हा.

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)
– [email protected]