
पर्यावरण संरक्षण आणि जुन्या झालेल्या डबलडेकरच्या पार्श्वभूमीवर बेस्ट आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिकवर चालणाऱया आधुनिक 900 वातानुकूलित डबलडेकर बसेस नव्याने खरेदी करणार आहे, मात्र बेस्टला बस पुरवणाऱया एका परदेशी कंपनीने करारानंतर वर्ष उलटले तरी बसेसचा पुरवठा न केल्यामुळे बेस्टकडून या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. मात्र, कंपनीच्या या मुजोरीमुळे बेस्टच्या डबलडेकर बस धोरणाची अंमलबजावणी सध्या तरी लांबणीवर पडणार आहे.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या डबलडेकर बसेस या शान असून सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 19 डबलडेकर बसेस आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने नवीन 900 वातानुकूलित डबलडेकर बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. जुन्या बसेस टप्प्याटप्प्याने भंगारात काढण्यात येणार आहेत.


























































