वृक्षासन – शरीर अन् मनाचा सुंदर योग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सीए अभिजित कुळकर्णी, योगशिक्षक, भारतीय योग मंदिर

एक अतिशय प्रसिद्ध, सहज आणि सोपे, पण काही वेळा तितकेच कठीण असे आसन म्हणजे वृक्षासन. वृक्षासनाचे साधनेसाठी महत्त्व प्राचीन काळापासून आहे.

वृक्षासनाचा विधी
सर्वप्रथम एका जागी स्थिर उभे राहावे. दोन्ही पाय प्रथम जुळवून ठेवावे. नंतर सावकाशपणे आपला डावा पाय दुमडून डाव्या पायाचे पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून ठेवावे. दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. डोळे उघडे ठेवावेत. आपली दृष्टी स्थिर करावी. एखाद्या स्थिर वस्तू किंवा स्थिर बिंदूवरती आपली दृष्टी केंद्रित करून ठेवावी. भरपूर श्वास सावकाशपणे भरून ओंकाराचं उच्चारण करावं. नंतर सावकाश दोन्ही हात वर उचलावेत आणि आपल्या डोक्याच्या वर खेचून ठेवावेत. नमस्कार करून ठेवावा. पुन्हा एकदा ओंकाराचं उच्चारण करावं. नंतर सावकाशपणे दोन्ही हात खाली आणावेत आणि हीच क्रिया दुसऱया पायाने अर्थात उजवा पाय दुमडून करावी. या आसनाला वृक्षासन म्हणतात. कारण या आसनामध्ये आपण वृक्षासारखे स्थिर उभे राहावे अशी कल्पना आहे.

लाभ कोणते…
वृक्षासन केल्याने आपल्या पायाच्या मांडय़ांचे स्नायू मजबूत होतात. हा एक चांगला लाभ आहे.
असे मानले जाते की, आपल्या शरीराची संतुलन करण्याची यंत्रणा जी लहान मेंदूमध्ये आहे तिला प्रभावित करणारे काही मर्मबिंदू आपल्या पायाच्या मांडय़ांमध्ये असतात. त्यावरती आपल्याच पावलांचा दबाव आल्यामुळे आपल्या शरीराची संतुलन करण्याची क्षमता आणि यंत्रणा जी आहे ती प्रभावित होते. एकाग्रता वाढते, मन स्थिर होते.

दृष्टी स्थिर करा…
वृक्षासन हे केवळ एक आसन नाही. वृक्षासन हा आपल्या मनाला स्थिर करण्याचा अतिशय उत्तम अभ्यास आहे. आपल्या मनामध्ये जितके विचार जास्त असतील तितकी आपली दृष्टी चंचल असते आणि मन जितके स्थिर असेल तितकी आपली दृष्टीही स्थिर असते. याच गोष्टीचा उपयोग वृक्षासनात केलेला दिसून येतो. या ठिकाणी आपली दृष्टी स्थिर केली जाते आणि दृष्टी स्थिर केल्यामुळे आपले शरीर स्थिर होते. दृष्टी स्थिर करायची असेल व शरीराचे संतुलन साधायचे असेल तर श्वासोच्छ्वासावरतीसुद्धा नियंत्रण असणे आवश्यक आहे. श्वासोच्छ्वासाचे नियंत्रण हे म्हणजे अतिशय मंद गतीने श्वास चालू राहणे किंवा श्वास रोखून धरणे या पद्धतीने करता येईल. त्याच वेळी आपली दृष्टी ही एखाद्या बिंदूवरती आपण स्थिर केली तर आपल्या शरीराचे संतुलन साधण्यास सहाय्य होते.

हे आसन आपले डोळे बंद करूनही करता येईल, पण त्यासाठी अधिक अभ्यासाची आणि सरावाची गरज आहे. सुरुवातीला डोळे बंद करून हे आसन करण्याचा प्रयत्न केल्यास शरीराचा तोल हमखास जातो आणि म्हणून सुरुवातीला डोळे उघडे ठेवूनच या आसनाचा अभ्यास करावा.

परिपूर्ण योगासन
वृक्षासन हा आपल्या शरीराचा व्यायाम आणि मनाचा व्यायाम या दोन्ही गोष्टींचा एक सुंदर योग आहे आणि म्हणूनच एक परिपूर्ण योगासन आहे. बहुधा म्हणूनच या आसनाचा उपयोग प्राचीन काळी तपश्चर्या करणारे ऋषीमुनी करत असावेत.

www.bymyoga.in