
>>संजय मोने
वचक या शब्दाला जागणारा असा हा अवलिया. समोरच्याला कधीही, कुठेही, कोणताही प्रश्न विचारून गारद करताना, तो चिडेल किंवा सरळ थोबाडीत मारेल, त्याचा अपमान होईल अशी कशाचीच भीती त्याला वाटत नसे. असा हा वसंत कमलाकर चहांदे, ज्याला वचक हे नाव आजही चिकटून आहे.
वसंत कमलाकर चहांदे, असं त्याचं नाव. आद्याक्षरं घेतली तर वकच असं होईल. पण कुणीतरी, कधीतरी, केव्हातरी ते वकच ही अक्षरं बदलून वचक अशी केली आणि ती त्याला आजपर्यंत चिकटून आहेत. खरं तर वचक हेच योग्य आहे. कारण त्याचा वचक होता, आहे आणि राहिलही. आता वचक का? तर त्याच्या तोंडून जी वाक्ये त्या काळात म्हणजे आमच्या कॉलेजच्या काळात बाहेर पडायची त्यांनी आम्हाला जबरदस्त भीती वाटायची. असं कसं कोणी विचारू शकतं? समोरच्या माणसाचा वकूब किंवा कीर्ती न जाणून घेता त्याला तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता? तो चिडेल किंवा सरळ थोबाडीत मारेल याची भीती कशी वाटत नव्हती वचकला? तर खरेच वाटत नव्हती. पहिली वचकची भेट स्पष्ट आठवते.
कॉलेजचा काळ. नव्या वर्षाच्या मुलांना भेटायला दोन-तीन आठवडय़ानंतर प्राचार्य आले. फार मायाळू, अगदी प्रेमळ म्हणावा असा माणूस.
“तुमच्या काही समस्या असल्यास मला सांगा” त्यांनी कॅण्टीनमध्ये येऊन एका विद्यार्थी वर्गाशी वार्तालाप करावा या इच्छेने मीटिंग घेतली होती. बाकी इतर विद्यार्थी गप्प होते. काय सांगणार आणि काय पार करणार? वचकने आपल्या हाताची करंगळी वर केली.
“स्वच्छतागृहाबाबतीत काही पारी आहेत का?” हळुवारपणे प्राचार्य विचारते झाले.
“कशावरून?” वचक म्हणाला.
“तसं नाही, करंगळी वर केलीत म्हणून विचारलं” प्राचार्यांचा स्वर मृदू आणि ओठांवर मंद हास्य. इतरांनीही त्यांच्या विनोदाला माफक हास्य करून मान्यता दिली. आपण समोरच्यांना पहिल्याच भेटीत जिंकलं आहे हे त्यांना जाणवलं.
“बोट कुठलंही वर असलं तरी समस्या वेगळीच आहे.” वचक ठणकावून म्हणाला.
“काय आहे समस्या?” प्राचार्य अजूनही मायेने विचारत होते.
“स्वच्छतागृहाच्या दरवाजावर पाटय़ा लावलेल्या आहेत त्याबद्दल.” वचक.
“कसल्या पाटय़ा?” प्राचार्य.
“मुलींच्या स्वच्छतागृहाबाहेर देवीयां असं लिहिलेलं आहे आणि मुलांच्या स्वच्छतागृहाबाहेर सज्जनो! असं लिहिलेलं आहे.” वचकचा तीक्ष्ण स्वर.
“मग?” प्राचार्य.
“मग काय सर, त्या देव्या आणि आम्ही नुसते सज्जन?”
“काय पाटी असली पाहिजे?” प्राचार्य.
“तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही नुसते सज्जन? असं कसं चालेल? उद्या त्या देव्या आम्हाला पाया पडायला लावतील.”
प्राचार्यांनी कपाळाला हात लावला.
“मग तुम्हाला जो काय बदल करायचा असेल तो सुचवा, पण आत जाऊन ािढया तीच करा.”
दुसऱया दिवशी पाटय़ा बदलल्या. मुलगे आणि मुली असा मजकूर लिहिला गेला. त्या दोन बदलांनी वचक संपूर्ण कॉलेजात एकदम फेमस झाला. त्याला सगळे प्राध्यापक आणि स्वत उपप्राचार्य व प्राचार्य ओळखू लागले. वचक अभ्यासात हुशार होता. इतरही सगळय़ा गोष्टींत तो भाग घ्यायचा. खेळातही चांगलाच उजवा होता. कॉलेजला दोन-तीन करंडकही त्याने मिळवून दिले.
सगळं छान चाललं होतं. वचक आता कॉलेजच्या दुसऱया वर्षांत गेला आणि अचानक एक दिवस ज्या कॅण्टीनमध्ये खाद्यपदार्थ मिळायचे, त्या कॅण्टीनवाल्याने सांभार आणि उसळ अधिक हवी असेल तर पाच पैसे जादा लागतील, असा फलक लावला. (साल 1977). तेव्हा आमच्या
कॅण्टीनमध्ये दहा पैशांना वडापाव मिळायचा. पंधरा पैशांना वडा उसळ किंवा इडली-वडा सांभार मिळायचे. बरोबर चटणी आणि उसळ किंवा सांभार परत परत मिळायचं. त्यात एकदम पाच पैशांची वाढ होऊन उसळ किंवा सांभारला जास्त पैसे मोजायला लागले होते. आम्हाला आणि बहुतेक सगळय़ांनाच तेव्हा महिन्याला दहा रुपये हातखर्चाला मिळायचे. घरी न सांगता एखादा चित्रपट त्यात आम्ही बसवायचो. कारण तिकीट दीड रुपये होते. तीन-चार जणांत एक बटाटावडा आणि उसळ व बाहेरून आणलेला पाच पैशांचा एक गोल पाव मिळायचा तो पाच-सहा घेऊन अधिकची फुकट मिळणारी उसळ किंवा सांभार घेऊन पोट फुटेपर्यंत आम्ही चापायचो. त्यात आता पाच पैसे अधिक द्यायचे म्हणजे सगळे आमचे अर्थकारण बिघडून गेले होते, पण आम्ही सगळे चुपचाप तो बदल सहन करून जगत होतो.
कॅण्टीनमध्ये वचक लागोपाठ तीन-चार दिवस संध्याकाळपर्यंत मुक्काम ठोकून होता. डोक्यात काहीतरी विचार चालू होते.
“सगळय़ांनी आठ-आठ आणे द्या. उद्याला हा फलक हटणार.” वचकने फर्मान काढलं. एकदम आठ आणे देणं शक्य नव्हतं तरीही बोलबोल म्हणता सहा-सात रुपये जमले.
“उद्या सकाळी लेक्चर्स वगैरे सोडा. साडेसात वाजता कॅण्टीनमध्ये या.” वचक एवढं बोलून निघून गेला. साडेसात वाजता आम्ही सगळे हजर झालो. वचक कॅण्टीनमध्ये आला आणि समोरच्या माणसाला म्हणाला.
“दहा पैशांचा एका वडा आणि शंभर एक्स्ट्रा सांभार द्या.”
“असं कसं देणार? एक प्लेट वडय़ाबरोबर एकच जादा सांभार मिळेल.”
“असं कसं? इथे लिहिलंय ना एक्स्ट्रा सांभार पाच पैसे? तेच हवंय. समोरच्या टेबलवर आणून ठेवा.”
कॅण्टीनवाला ऐकायला तयार नव्हता. वातावरण तापलं. अगदी पेटून उठलं. पार वरपर्यंत गेलं. एक प्राध्यापक काय मामला आहे ते बघायला आले.
“सर, फलकावर चारपदार्थ मिळतात. वडा, इडली, मिसळ आणि चहा. आता एक्स्ट्रा सांभार-चटणी हा नवा पदार्थ आलाय.”
“अरे. मुला…”
“थांबा सर, मला 50 प्लेट वडा मिळेल ना?” वचक म्हणाला.
“हो.”
“तर मग सर 100 प्लेट सांभार का नाही मिळणार?” वचक.
“सर साहेब, 100 प्लेट यांना दिलं तर मग इतरांना काय देऊ?” कॅण्टीनवाला अजिजीने म्हणाला.
सरांनी वचकला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता आणि त्याची मागणी पूर्णपणे कायद्याच्या कक्षेत होती. साधारण दहा मिनिटांच्या चर्चेनंतर
कॅण्टीनवाल्याने स्वत उठून सांभार-चटणीचा मजकूर ओल्या कपडय़ाने पुसून टाकला. वचक झिंदाबाद!
अनेक वर्षे लोटली. वचकशी संबंध उरला नाही. कधीकधी त्याचे किस्से ऐकू यायचे. एका आमदाराला अचानक जनतेची निवडणूक आली म्हणून आठवण झाली. त्याने जनता दरबार बोलावला.(लोकशाही असूनही ‘दरबार’ का भरवतात देव जाणे.) आमदार बोलायच्या आत वचक उठला आणि मागच्या वेळी-निवडून आलो तर काय काय करेन याचं एक यादीवजा पत्रक काढलं होतं ते धडाधडा वाचायला सुरुवात केली. आश्वासनं अजिबात पाळली गेली नव्हती हे लोकांच्या लक्षात आलं.
“तर, आधी आमदार साहेबांनी मागच्या कामांचा म्हणजे न झालेल्या किंवा न केलेल्या, पूर्ण जबाब द्यावा तरच पुढे बोलावं.”
पाच मिनिटांत सभा बरखास्त झाली. आमदार निवडणुकीत पडला. काही वर्षांपूर्वी एकदा एका ठिकाणी पार्टीत वचक भेटला.
“वचक, कसं काय चाललंय?”
“उत्तम, मी मुंबई सोडली. बाहेरचे इथे येतात आणि जाता जात नाहीत. तेव्हा आपणच शांत ठिकाणी जावं हे उत्तम. मुलं परदेशात असतात. मी मस्तपैकी चिपळूणकर झालोय.”
आम्ही बराच वेळ बोलत होतो. तेवढय़ात कानांवर शब्द आले.
“सरकारी अधिकाऱयांनी तोंडी आदेश पाळले नाहीत तर भ्रष्टाचार कमी होईल.” कोणीतरी निवृत्त अधिकारी तावातावाने बोलत होता.
वचकच्या डोळय़ांत अचानक चमक आली.
“चल, जरा बघू या साहेबांना.”
पुढे होऊन वचक बोलायला लागला.
“साहेब तुम्ही जेव्हा पदावर होतात तेव्हा तुम्ही आता म्हणालात ते 100 टक्के पाळत होता का? माझ्याकडे तसे तुम्ही न केल्याचे पुरावे आहेत. नंतर सांगू की, आता इथे सगळय़ांसमोर?”
मी तिथून निघालो. पार्टी होती तिथपर्यंत थांबणार होतो, पण वचकच्या प्रश्नानंतर ती दोन मिनिटांत संपेल याची खात्री पटली होती.





























































