
सोलापूर शहर व परिसरात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने चार हॉटेल्स व धाब्यावर धाडी घालून 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल स्वाद, विकास, एंजल व तावजीराजे ढाबा येथे धाडी घातल्या असून, हॉटेलचालकांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हैदराबाद रोडवरील हॉटेल स्वाद येथे अवैधरीत्या दारूविक्री सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. स्वाद हॉटेलवर धाड घालून चालक सुनील शंकर कांबळे व दत्ता लोंढे, सागर सरवदे, वसीम नदाफ यांना अटक करण्यात आली. दरम्यान, मजरेवाडी येथील हॉटेल विकासमध्ये चालक सिद्धराम बालाजी मोरे, विजय बनसोडे, स्वप्नील काळे, शिवराज कसुरे, मंद्रूप रोडवरील हॉटेल एंजल येथे चालक मोतीलाल राठोड, अमोगसिद्ध मोगलाई, आकाश उमराठी, शिवराज कोळी यांना अटक केली.
मोहोळजवळील हिवरे गाव येथे असलेल्या तावजी राजे ढाब्यावर धाड घालून चालक तानाजी शिवाजी देवकते, बबलू अबुल शेख, सुद्रास कोकीळ यांना अवैधरीत्या दारूविक्री करताना व पिताना राज्य उत्पादन पथकाने धाडी टाकून अटक केली आहे. चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार, तर दारू पिणाऱयांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल बांगर, उषाकिरण मिसाळ, किरण बिरादार, सदानंद मस्करे, कृष्णा सुळे, अक्षय भरते, मयुरा खेत्री, मुकेश चव्हाण व त्यांच्या पथकाने केली आहे.


























































