आयर्लंड दौऱ्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविडला विश्रांती देण्याची शक्यता, आराम की विराम ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर असलेल्या हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आगामी आयर्लंड दौऱ्यावर जाणार नसल्याचे सूत्रांकडून कळले आहे. या तीन टी-20 सामन्यांच्या छोटेखानी दौऱ्यात द्रविडसह सहप्रशिक्षक विक्रम राठोड आणि पारस म्हांब्रे यांनासुद्धा आराम देणार असल्याचे कळले आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यासाठी एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एका आठवडय़ाच्या दौऱयासाठी सर्व प्रशिक्षकांना दिला जाणारा आराम हा आगामी काळाचा विराम तर नाही ना, अशी शंकाही आतापासून उपस्थित होऊ लागली आहे. रवी शास्त्राr यांची प्रशिक्षकपदावरून गच्छंती केल्यानंतर राहुल द्रविड यांच्याकडे हिंदुस्थानी संघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र गेली दोन वर्षे संघाचे प्रशिक्षकपद भूषविल्यानंतरही द्रविड यांना हिंदुस्थानी संघासाठी अद्यापही फार मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या अनपुस्थितीत नव्या पर्यायाचा शोध घेण्याची तयारी बीसीसीआयने सुरू केल्याचे कळले आहे. आगामी आयसीसी विश्वचषकापर्यंत द्रविडकडे संघाचे प्रशिक्षकपद कायम असेल. मात्र त्यानंतर हिंदुस्थानी संघासाठी प्रशिक्षकाची भूमिका कोण निभावू शकतो याची चाचपणी करण्यास बीसीसीआय आयर्लंड दौऱयापासूनच सुरुवात करणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी द्रविडला आराम नव्हे, तर त्याच्या प्रशिक्षकपदाला विराम देण्यासाठी उचललेली पावले असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. या वृत्ताला कुणीही दुजोरा दिला नसला तरी ही विश्रांती केवळ आयर्लंड दौऱ्यापुरती आहे. त्यामुळे लक्ष्मण केवळ आयर्लंड दौऱयासाठी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळतील आणि सीतांशु कोटक आणि हृषिकेश कानिटकर हे दोघे गोलंदाजी आणि फलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाताळतील असे समोर आले आहे.

बुमराहच्या पुनरागमनाची शक्यता

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची दाट शक्यता आहे. ही आशिया कप आणि वर्ल्ड कपपूर्वी तयारी करण्यासाठी महत्त्वाची मालिका मानली जात आहे. बुमराह हा हिंदुस्थानच्या गोलंदाजीचा कणा असल्यामुळे त्याला पुरेसा सराव मिळाला म्हणून त्याची आयर्लंड दौऱयासाठी निवड होणे साहजिकच आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानची वेगवान गोलंदाजी बोथट झाल्याचे अवघ्या जगाने पाहिले आहे. त्यामुळे कोटय़वधी क्रिकेटप्रेमी बुमराहच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दाऱैयात हार्दिक पंडय़ाकडे हिंदुस्थानचे नेतृत्व असेल. या मालिकेत श्रेयस अय्यरसुद्धा संघात दिसू शकतो. मात्र केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचे पुनरागमन या मालिकांदरम्यान होण्याची शक्यता फार कमी आहे.