
राज्य सरकारने ‘अ’ वर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये निम्न स्तरापर्यंतचे आरक्षण दिले आहे. सरकारच्या या धोरणावर आक्षेप घेत ‘अ’ वर्गातील दिव्यांग कर्मचाऱयांनी संपूर्ण 4 टक्के आरक्षणासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकांवर मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवत आपले हात झटकले. आम्ही केंद्र सरकारचे धोरण फॉलो केले आहे. त्यामुळे यासंदर्भात केंद्राला नोटीस बजावण्याची विनंती करण्यात आली. तथापि, राज्य सरकारची ही विनंती धुडकावत न्यायालयाने संबंधित सर्व याचिकांवर 11 ऑगस्टला अंतिम सुनावणी निश्चित केली.
दिव्यांग कर्मचाऱयांच्या पदोन्नतीसंदर्भातील 2021 मधील राज्य सरकारच्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दिव्यांग कर्मचाऱयांतर्फे ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर, ऍड. सिद्धेश पिळणकर यांच्यासह इतरांनी आठ याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांवर मंगळवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने या प्रकरणात ऍड. अभिनव चंद्रचूड यांची ‘अमिकस क्युरी’ म्हणून नियुक्ती केली आहे. मंगळवारी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हजेरी लावली होती. पदोन्नतीमध्ये दिव्यांग कर्मचाऱयांना जाणूनबुजून डावलले जात आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला.



























































