विधिमंडळ अधिवेशन – अंधेरीच्या रामबागमधील दरडग्रस्तांना भरपाई द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील चकाला महाकाली गुंफा मार्ग येथील रामबाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या मागील डोंगराचा काही भाग कोसळून रहिवाशांचे नुकसान झाले. त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार ऋतुजा लटके यांनी विधानसभेत केली. 25 जुलै रोजी पहाटे 2 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाच सदनिकांमधील सामानाचे फार मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर आपत्ती निवारण कक्ष, फायर ब्रिगेड, महापालिका व शासकीय अधिकारी यापैकी कोणाचीही मदत मिळालेली नाही. मी स्वतः तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली, असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन दिवसांत भरीव विकास निधी द्या, अन्यथा न्यायालयात जाऊ

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर विकास निधी देताना खैरात करण्यात आली, मात्र काँग्रेस आमदारांवर अन्याय झाला. याबद्दल काँग्रेसच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन दिवसांत विकास निधी द्या अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी मिंधे सरकारला दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व आमदारांनी विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयात शिंदे यांची भेट घेऊन विकास निधीबाबत चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

वेरावली येथील धोकादायक इमारतींचा विकास करा

जोगेश्वरी येथील वेरावली सरोवराजवळ असलेल्या इमारती या धोकादायक अवस्थेत असून त्यांचा तातडीने पुनर्विकास केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रवींद्र वायकर यांनी विधानसभेत केली. वेरावली सरोवराजवळील इमारती धोकादायक बनल्याने सातत्याने सांगूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आज तिथे दुर्घटना घडली. इमारत क्रमांक 1 मधील 7 क्रमांकाच्या खोलीचे छत पूर्णपणे कोसळले. त्यामुळे या इमारतींच्या परिसरात खूप मोठी जागा असून तिथे नवीन वसाहत बनवली जाऊ शकते. तसे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना द्यावेत, असे आमदार वायकर यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे सभागृहात सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकारार्थी उत्तर दिले.