
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवले, अडीच वर्षात अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाही, असे बावनकुळे म्हणाले होते. आता बावनकुळे यांना विधानपिरषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले की, मंत्रालयात आल्यानेच काम होत असते, तर फार परिवर्तन झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना काळात कुठे-कुठे गेले होते, हे विचारले पाहिजे. अडीच वर्षांत काय केले, हे एका थंबवर कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना आणि धारावीतील जनतेला विचारा. महाराष्ट्राच्या इतिहासातील अभुतपूर्व काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे, असे दानवे यांनी सांगितले.
केंद्रातील मंत्र्यांना कवडीचेही काम नाही. केंद्रीय मंत्र्यांना 26 दिवसांचे दौरे दिले जातात. मंत्री जनतेची काय कामे करतात…पण, उद्धव ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह नाही. तरीही त्यांच्याविरोधात केंद्र आणि राज्यातील मंत्री दळण दळतात. यातच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ताकद दिसून येत आहे,असेही दानवे यांनी सांगितले.


























































