विधिमंडळ अधिवेशन – पावसाळी अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंतच होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचे कामकाज पूर्वी ठरल्याप्रमाणे 4 ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱयामुळे मंगळवारी अधिवेशनाचे कामकाज होणार नाही. या बैठकीनुसार उद्या (शुक्रवारी) शासकीय कामकाज व अशासकीय कामकाज होईल. शनिवार आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने कामकाज नाही. सोमवार-मंगळवारी सभागृहाची बैठक होणार नाही. 2 ऑगस्ट रोजी शासकीय कामकाज आणि गुरुवारी 3 ऑगस्ट रोजी अंतिम आठवडा प्रस्ताव, 4 ऑगस्ट रोजी अशासकीय कामकाज होईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

अभ्युदय नगरातील ललित कला भवन तातडीने उभारा

काळाचौकी येथील अभ्युदय नगरात कामगार कल्याण मंडळाचे ललित कला भवन हे धोकादायक बनल्याने ते कोसळले. ते पुन्हा उभारण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न करतोय. कामगार कल्याण मंडळानेही तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. परंतु ती म्हाडाची जागा असल्याने म्हाडाकडून एनओसी आवश्यक आहे. ती मिळाल्याशिवाय बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे म्हाडाला राज्य शासनाने त्यासंदर्भात सूचना द्याव्यात, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे दिली.

तलाठी भरतीचे परीक्षा शुल्क कमी करा

राज्यात तलाठी भरतीसाठी आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क कमी करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदेमध्ये केली. तलाठी भरतीसाठी सुमारे अकरा लाख अर्ज आलेले असून भरतीचे काम सोपवण्यात आले आहे त्या पंपनीला यातून 110 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ही विद्यार्थ्यांची लूट असून शासनाने शुल्क कमी करावे, अशा मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत याकडे आमदार पोतनीस यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.

सर्पदंशावरील उपचार महात्मा फुले योजनेतून

सर्पदंशावर राज्यात होणाऱया मृत्यूंबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज अतिशय तीव्र शब्दांत चिंता व्यक्त केली. सर्पदंशावरील संपूर्ण उपचारांचा खर्च महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून करण्याचे आदेश आज विधानसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला दिले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पेणमधील सारा ठाकूर (12) या मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव म्हणाले की, सर्पदंशावरील उपचारांसाठी एखाद्याला खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केल्यावर औषधाचा व आयसीयूचा खर्च गृहीत धरला जात नसल्याकडे लक्ष वेधले होते.

नंदुरबार, पालघरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय

आरोग्यसेवांना बळकटी यावी याकरिता नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी व्हावी यासाठी सरकारकडून अतिदुर्गम भागातही नंदुरबार आणि पालघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रश्नोत्तरांच्या तासांत विधान परिषदेत दिली. नंदुरबार आणि पालघर जिह्यांत विशेषोपचार रुग्णालय सुरू करण्याबाबत विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न विचारला होता.