
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
कारगील युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात. एका म्हणीनुसार ‘देव आणि सैनिकांवर आपण सर्वच प्रेम करतो, पण जेव्हा आपल्याला किंवा देशाला धोका निर्माण झाले तेव्हाच त्यांची आठवण येते. ते संकट जाते तेव्हा आपण त्यांना विसरतो.’ जे राष्ट्र आपल्या सैनिक आणि देश सुरक्षेला विसरते, ते कधीही मोठे होऊ शकत नाही.
कारगील युद्धाला 24 वर्षे पूर्ण झाली. अत्यंत खडतर परिस्थितीत जिवाची पर्वा न करता ज्या सैनिकांनी देशाच्या सुरक्षिततेला अबाधित ठेवले, त्यांच्या शौर्यापुढे नतमस्तक होऊन हिंदुस्थानी नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना आपणदेखील तेवढेच तत्पर राहायला हवे. पाकिस्तानी लष्कर मे 1999 मध्ये कारगील सेक्टरमध्ये घुसखोरांच्या रूपात आले. पाकिस्तानी लष्कराला हिंदुस्थानी भूमीवरून हुसकावून लावण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केले. यात हिंदुस्थानी लष्कराचे 30 हजार जवान सहभागी झाले. 26 जुलै 1999 रोजी हिंदुस्थानी लष्कराने कारगीलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी 26 जुलै रोजी कारगील विजय दिवस साजरा केला जातो. हिंदुस्थानी लष्करातील 543 अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले. 1300 जवान जखमी झाले. कारगील युद्धात ठार झालेल्या हिंदुस्थानी जवानांचा वयोगट 19 ते 28 असा होता.
लेफ्टनंट सौरभ कालियांमुळे पाकिस्तानी घुसखोरीची माहिती सर्वात प्रथम मिळाली. केवळ 18 महिन्यांपूर्वी हिंदुस्थानी लष्करात भरती झालेले कॅप्टन विक्रम बात्रा कारगिल युद्धात शहीद झाले. कॅप्टन विक्रम त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बात्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते की, हिंदुस्थानचा विजयी ध्वज रोवून परत येईन किंवा त्यात लपेटून येईन. बात्रा यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
22 वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी हिंदुस्थानी लष्करात दाखल झाले होते. लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र बहाल करण्यात आले. विजयंत यांचे वडील निवृत्त कर्नल वी. एन. थापर प्रत्येक वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून मुलगा जेथे शहीद झाला होता, तेथे सर्व सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जातात.
खालुबर रिजलाइनला पाकिस्तानी जवानांच्या ताब्यातून सोडविताना कॅफ्टन मनोज पांडे शहीद झाले. यावेळी त्यांचे अंतिम शब्द होते, ‘‘ना छोडनू’’ (नेपाळी भाषेचा मराठी अर्थ – त्यांना सोडू नका). 24 वर्षांचे पांडे यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. ज्या लेह, लडाख भागात कारगीलचे युद्ध झाले, त्या भागात आपले सैन्य फार कमी होते. आता या भागात हिंदुस्थानी लष्कराने सैन्याची संख्या आणि पेट्रोलिंग वाढविल्यामुळे पुन्हा कारगील युद्धासारखी परिस्थिती निर्माण होणे अशक्य आहे. मात्र लडाखच्या हिंदुस्थान-चीन सीमेवर अद्यापी सैन्याची संख्या कमी आहे. कारगीलसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी 17 माऊंटन स्ट्राईक कोर नवी लष्करी तुकडी तयार करावी.
अंदमान-निकोबार ही बेटे श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार यांसारख्या देशांमधून येणाऱया लोकांसाठी एक प्रकारचे आश्रयस्थानच बनले आहे. पाकिस्तानचे नौसैनिक दादागिरी करून हिंदुस्थानी मासेमारांना पकडतात. दोन-दोन, तीन-तीन महिन्यांपर्यंत या मासेमारांच्या क्षेमकुशलतेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना काहीही माहिती दिली जात नाही. या मासेमारांच्या नौका तोडून टाकल्या जातात, जाळे समुद्रात फेकून दिले जाते. या साऱया प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या आपत्तीबाबत कोण विचार करतो? आजच्या दिवशी आपले 250 हून जास्त मासेमार आणि त्यांच्या बोटी पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. शत्रू आणि देशविरोधी शक्तींचे डावपेच वेगाने बदली होत आहेत. पूर्व किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात बांगलादेशी घुसखोरी होत आहे. पश्चिम आणि दक्षिण किनारपट्टीवरून अफू, गांजा, चरसची तस्करी थांबण्याचे काहीही लक्षण दिसत नाही. नौदल हे का थांबवत नाही?
हिंदुस्थानकडे अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीप, मिनिकॉय हे दोन द्वीपसमूह आहेत. अंदमान-निकोबार हा प्रदेश बंगालच्या उपसागरात वसलेला असून त्याचा 8249 चौरस किलोमीटर इतक्या परिसरात विस्तार आहे. अंदमान आणि निकोबारच्या 650 बेटांपैकी केवळ 28 बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. उर्वरित बेटांवर मनुष्यवस्ती नसल्यामुळे तसेच त्या भागात सैन्य नसल्यामुळे समुद्री लुटेरे किंवा दहशतवादी तेथे आपले तळ बनवू शकतात अशी भीती आहे. त्यामुळे या बेटांवर कोस्ट गार्ड, नौदल तसेच हवाई दलाच्या माध्यमातून पेट्रोलिंग वाढविण्याची गरज आहे. अशी बेटे शत्रूने ताब्यात घेतल्यास ती बेटे परत मिळविण्याची ताकद आपल्या सैन्यात असणे गरजेचे आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये सैन्याच्या दोन बटालियन्स तैनात करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक बेटावर सैन्य ठेवायचे असल्यास मोठय़ा प्रमाणावर सैनिकांची तसेच पैशांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सध्या तरी या भागात टेहळणीचा पर्यायच लष्कराने स्वीकारला आहे. या भागात कुणीही आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्याची क्षमता हिंदुस्थानी सैन्यामध्ये आहे.
नेपाळ, भूतान आणि म्यानमार या राज्यांच्या सीमेवर एक लाख 41 हजार जवान तैनात आहेत, पण हिंदुस्थानच्या 7 हजार 500 किलोमीटर सागरी किनारपट्टी असलेल्या भागासाठी फक्त बारा हजार कोस्ट गार्डची पदे आहेत. यामधील 4 हजार पदे रिक्त आहेत. सागरी सुरक्षा विषय हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे कोस्टल सिक्युरिटीसंदर्भात एक अभ्यास केंद्र उभे केले पाहिजे, त्या ठिकाणी विचारवंत आणि अभ्यासकांची गरज आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेकडे सर्वांचेच लक्ष असते. मात्र हिंदुस्थान-चीन, हिंदुस्थान-नेपाळ, हिंदुस्थान-म्यानमार, हिंदुस्थान-बांगलादेश, हिंदुस्थान-श्रीलंका येथून घुसखोरी, तस्करी कायमच सुरू असते. या सर्व सीमा सुरक्षित करण्याची गरज आहे.
चीन, पाकिस्तानसह हिंदुस्थानच्या इतर शत्रूंनी हिंदुस्थानच्या अंतर्गत सुरक्षेची अनेक आव्हाने आपल्यासमोर उभी केली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सीमा काही प्रमाणात सुरक्षित झालेल्या असल्या तरी अजूनही त्या पूर्णपणे सुरक्षित झालेल्या नाहीत. हिंदुस्थानसमोरील सुरक्षेची आव्हाने बहुआयामी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांना सामोरे जाण्यासाठी लष्कराची ताकद वाढविण्याची गरज आहे. कारगील दिवसाच्या निमित्ताने आपले सरकार या सगळ्या सुरक्षेच्या पैलूंवर विचार करेल अशी अपेक्षा आहे.




























































