
>> महेंद्र पाटील
आठवण’ हा शब्दच मनाला दूर घेऊन जाणारा… कोपऱ्यातल्या त्या हळव्या कप्प्याला स्पर्श करणारा आहे. आठवणी कशाही असल्या तरी त्या जपल्या जातात. किंबहुना, आपणच त्या जपून ठेवतो. अगदी जन्मभर. मग केव्हातरी आपणच त्यांना शोधत बसतो आणि त्या गत क्षणांच्या शोधात रमून जातो. वर्तमानात जगणारी माणसं आठवणींशिवाय जगूच शकत नाहीत. कारण आठवणी या कुणासाठी प्रेरणादायी असतात तर कुणाला आधार देणाऱया. मनाच्या गाभाऱयात आठवणींना देवासारखं स्थान असतं. मनोभावे जीव लावून आपण त्यांना जपतो आणि जेव्हा आयुष्याच्या एका निवांत संध्याकाळी आपलं मन बेचैन होऊन काहीतरी शोधू लागतं त्या वेळी आपण मागे वळून पाहतो तेव्हा गत काळातल्या आठवणींचा थवा आपल्यासमोर उभा येऊन ठाकतो. तेव्हा लक्षात येतं की, किती आठवणी आपण मनात साठवून ठेवल्या आहेत. कळायला लागलं तेव्हापासून आत्तापर्यंत खूप आठवणी मनात येऊन घर करून राहिलेल्या असतात.
शाळेतला पहिला दिवस, पहिलं दप्तर, शाळेत भेटलेला पहिला मित्र, शाळेतून घरी परतताना रेनकोट असूनही मुद्दाम पावसातलं भिजत जाणं, पहिल्या पुस्तकाचा नवाकोरा गंध, नव्या वहीवर लिहिलेला पहिला शब्द, एखाद्या मित्राबरोबर झालेलं पहिलं भांडण, पहिली भेट, पहिलं प्रेम, पहिलं पत्र आणि आजोळी जाताना गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत मनात घर करून राहिलेला निसर्ग, नदीकिनारी पाण्यात पाय बुडवून बसलेली संध्याकाळ आणि पाण्यात सोडलेल्या कागदी होडय़ा, पहिली शाबासकी, पहिलं कौतुक, पहिली कविता, पहिल्यांदा लागलेली ठेच, दुखावलेलं मन आणि व्याकूळ होऊन कधीतरी डोळ्यांत आलेले अश्रू… अशा मोजता न येणाऱया पहिल्या क्षणांच्या आठवणी खूप आनंद देऊन जातात मनाला. कुठून कुठवर, कसा प्रवास केला याचा अभिमान बाळगत आयुष्याची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक नव्या वळणावर नव्या आठवणी जन्म घेतात आणि आपल्या मनाच्या कोपऱयात जाऊन बसतात.
काही आठवणी खूप वेगळ्या, शेवटच्या क्षणांच्या… शाळेतला शेवटचा दिवस, शाळेच्या गेटवर येऊन पुन्हा मागे वळून पाहिल्यावर डोळ्यांत साठवून घेतलेली शाळा आणि आवंढा गिळत धरलेला घराचा रस्ता, पुन्हा आयुष्यात कधीच भेटणार नाही हे ठाऊक असलेले काही मित्र, दूर जाताना दाटून आलेला कंठ, शेवटची भेट, मग ती कुणाचीही असो, मनाला सतत हुरहुर लावणारी शेवटची पत्रं, एखादी जवळची व्यक्ती हे जग सोडून जाताना तिचा पाहिलेला शेवटचा चेहरा, एखाद्या सुंदर प्रवासातला शेवटचा टप्पा… आठवणींना कधी शेवटच नसतो. प्रत्येक शेवटची आठवण ही नव्या आठवणींना जन्म देते. अशा असंख्य आठवणी आपल्यासमोर जेव्हा येतात तेव्हा आपल्याला स्वतवर हसू येतं. इतके वेडे क्षण आपण जपून ठेवलेले असतात. स्वतला आधार देण्यासाठी आपण खूपदा या आठवणींचा वापर करतो आणि आठवणीसुद्धा प्रामाणिकपणे साथ देतात, पण आपण खरोखरच प्रामाणिक असतो का आपल्या आठवणींशी? हा प्रश्न जेव्हा मनात येतो तेव्हा त्याचं उत्तर नाइलाजाने ‘नाही’ असं असतं. कारण जन्मापासून मनात जपलेल्या आठवणींना खूप घट्ट कवटाळून ठेवलेलं असतं, मनात आणि हृदयात…आणि एक दिवस असा येतो, आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला आपण अलगदपणे हे जग सोडून निघून जातो. इतकी वर्षं जपून ठेवलेल्या आठवणी एका क्षणात पोरक्या होतात. असंख्य आठवणी उराशी बाळगून आपण जगत असतो. पोरक्या झाल्यावर त्या आठवणी सगळ्या एकत्र मिळून आपल्यासाठी दोन थेंब डोळ्यांत अलगद साठवून दुःखी होतात. कारण त्या वेळी त्यांना जाणीव झालेली असते की, आपल्याला मनाच्या कोपऱयात जमा करून जपणाराच आता राहिलेला नाही. त्याच आठवणींच्या दुःखी मनात मग आपण एक आठवण म्हणून जगू लागतो.





























































