साहित्यजगत- केवळ वाचनालय नव्हे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रविप्रकाश कुलकर्णी

एक ऑगस्ट म्हटलं की, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. त्याच्या जोडीलाच या वर्षी 1 ऑगस्टला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. ही मराठी सांस्कृतिक जगतातील विशेष गोष्ट आहे. दिवसेंदिवस सांस्कृतिक जगतात पडझडीच्याच बातम्या जास्त येताना दिसतात. अशा वेळी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासारख्या संस्थेचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारंभ होत आहे ही निश्चितच मनाला उभारी देणारी गोष्ट आहे. अर्थात याचे श्रेय संस्थेच्या स्थापनाकर्त्यांपासून आलेले आजतागायतचे पदाधिकारी, वाचकांना, अभ्यासकांना, सहकार्य करणाऱया सेवक वर्गाला जाते.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय म्हणजे जास्त करून मराठी साहित्यासंदर्भात अद्ययावत संदर्भ सेवा देणारे वाचनालय अशी ख्याती दूरवर पोहोचली आहे. विशेषत: नियतकालिकातील, वर्तमानपत्रातील, साप्ताहिक, मासिकासारख्या गोष्टींतून आलेल्या साहित्यिक लेखांची, नोंद अद्ययावत पद्धतीने केलेली आहे. या संदर्भनोंदी कॉम्प्युटरप्रमाणेच कार्ड पद्धतीनेही केलेल्या आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे हे एक प्रमुख वैशिष्टय़ आहे. त्यामुळे मराठीविषयक अभ्यासकांना या वाचनालयाचा संदर्भासाठी चांगला उपयोग होतो. संग्रहालयाने साहित्य व्यवहारातील विविध अंगांनी जो पसारा वाढवला तो थक्क करणारा आहे. त्यात कोश प्रकल्प, प्रकाशन, व्याख्यान, व्यासपीठ उपाम, सूची सेवा असे अनेक उपक्रम आहेत.

ज्ञात वाचनालयाची विविध अंगे पाहिल्यामुळे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्रेमात अभ्यासक पडतोच, पण त्याची व्याप्ती किती आहे याचा अभ्यास करायला पाहिजे याची जाणीव प्रदीप कर्णिक यांना झाली. त्यामुळे त्यांनी एम. लिब. पदवीनंतर पीएचडीसाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने केलेल्या योगदानाचे मूल्यमापन हा विषय घेतला. डॉ. श. रा. गणपुले यांच्या सक्षम मार्गदर्शनामुळे कर्णिकांना पुणे विद्यापीठाची पदवी मिळाली. मात्र हा प्रबंध इंग्रजीत होता आणि हा विषय मराठी साहित्य जगतापर्यंत पोहोचायचा असेल तर तो मराठीतच हवा या जाणिवेने हा प्रबंध आणि त्यात अधिक काही भर टाकून तो तब्बल सोळा वर्षांनी प्रकाशित केला. हा प्रबंध ग्रंथसंग्रहालयाचे एक अंग असलेल्या मराठी संशोधन मंडळातर्फे प्रकाशित झालेला आहे. तसेच संग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात प्रकाशित होणे हे त्याचे वेगळेपण. या कार्यकाळात डॉ. प्रदीप कर्णिक हेच मराठी संशोधन मंडळाचे संचालक होते. हा ग्रंथ मराठीत यावा म्हणून प्रख्यात लेखिका राणी दुर्वे यांनी ग्रंथाच्या छपाईसाठी आपले वडील रवींद्र दुर्वे यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांची देणगी दिली. असे औदार्य दुर्मीळ आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मीळ संदर्भ ग्रंथामुळे अनेक ग्रंथांचा जीर्णोद्धार झालेला आहे. सहज आठवणारे उदाहरण म्हणजे द. बा. पारसनीस यांचे ऐतिहासिक संदर्भ देऊन लिहिलेले पहिले झाशीच्या राणीचे चरित्र. यावरून पुढे वरदा प्रकाशनने पुनर्मुद्रण केले. राम कोलारकर यांनी मराठी लघुकथांचा प्रवास सप्रमाण मांडला तो या संग्रहालयातील मासिकांच्या प्रचंड संग्रहातून.

एक वेगळे उदाहरण सांगतो. दुर्गा भागवत यांचे कदंब वृक्षावरील ‘सांगोपांग’ पुस्तक जे हरवले होते, ते या संग्रहालयात सापडले संग्रहालयातील मनोहर पारायण यांना. संग्रहालयातील गावसकर सभागृहात एकेकाळी ऐतिहासिक असे प्रकाशन समारंभ झाले आहेत. भारत सासणे यांचा पहिला कथासंग्रह, चित्रपट संगीत लेखनाबाबत ज्याला अभिजात म्हणता येईल असे माधव मोहोळकर ‘कृतगीत’, ‘गीतयात्री’ लेखसंग्रह इथेच प्रकाशित झाले. त्याचे प्रकाशन तलत मेहमूद यांच्या हस्ते झाले होते. तस्लिमा नसरीन यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन आणि मुलाखत इथेच झाली होती. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पहिल्या 75 वर्षांचा इतिहास रा. के. लेले यांनी लिहून ठेवला आहे. आता त्यापुढच्या 50 वर्षांचा इतिहास लिहिला जावा. मराठी विश्वात संस्थांची परंपरा मोठी दिसते, पण ती प्रदीर्घ टिकलेली दिसत नाही. त्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हा उज्ज्वल अपवाद. महाराष्ट्राचा हा मानबिंदू चिरायू होवो!