अवलिया- पटवर्धन काका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते.  हे  तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

डोईवरच्या विरळ झालेल्या काळ्यापांढऱ्या केसांचा नीटस भांग पाडलेला, उभ्या चणीच्या चेहऱयावर पांढुरक्या भुवया, त्याखाली करारी डोळे, तरतरीत नाकाखाली जिवणीवरून खाली झुकलेल्या माफक मिश्या, उंची बेताची पण सडसडीत अंगयष्टी, गोरापान वर्ण, उत्तम रंगसंगती साधलेले साधे हलक्या रंगाची शर्ट आणि पँट. एवढं सगळं एकत्र केलं की, आमच्या सोसायटीचे पटवर्धन काका तयार होतात.

‘मी रामचंद्र पटवर्धन !’

पहिल्या भेटीत त्यांनी त्यांची ओळख करून दिली आणि त्याचे  दाट ओळखीत रूपांतर झालं. वरकरणी फटकळ वाटणाऱया काकांमध्ये मला वेळोवेळी ज्या माणुसकीचं दर्शन होत गेलं, त्यामुळे मी त्यांच्याकडे जास्त आकर्षित झालो. तशी आमची सोसायटी म्हणजे वसलेलं एक छोटंसं गावच. यात काकांच्या असंख्य ओळखी. याचे मूळ त्यांच्या सात्त्विक, सज्जन स्वभावामध्ये आहे हेही कळत गेलं. कुणाच्याही सुखदु:खात सहजपणे सामील होणं हा त्यांचा अंगभूत गुण. दिवाळीला काम करणाऱया लेबर लोकांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून बक्षिस देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, कुणी अडचणीत असला तर त्याच्या पाठीशी उभं राहणं इत्यादी. ते कुणी श्रीमंत आसामी नव्हते. पोटापुरती पेन्शन मिळणारं साधंसुधं व्यक्तिमत्त्व होतं. मनाने मात्र अलोट श्रीमंत गृहस्थ. मी त्यांना कधी ‘भाव’ करताना पाहिलं नाही. “अहो, करायचेत काय रुपया दोन रुपये वाचवून? बिचारा रस्त्यावर पोट भरायला बसलाय, चारदोन रुपये मिळू देत की त्याला. तेवढीच आपल्याकडून मदत. आमचे वडील म्हणायचे…”

हे त्यांचं एक वैशिष्टय़, काहीही बोलताना वडिलांचा संदर्भ द्यायला ते विसरत नाहीत. आपल्या वडिलांवर इतकं प्रेम असणारा एकमेव माणूस म्हणजे काका. “वडील म्हणायचे, कुणाच्याही चहाचासुद्धा मिंधा होऊ नकोस. पदरात पडेल तेवढय़ा उत्पन्नात भागव. तुला काही कमी पडणार नाही आणि त्यांचे शब्द खरे ठरले बरं, काय समजलेत?”

सरकारी नोकरीत, जिथे भरपूर बाहेरची कमाई होऊ शकणाऱया महत्त्वाच्या पदावर काम करणाऱया या माणसाने खरोखर अत्यंत निखालसपणे आपलं कर्तव्य निभावलं. त्यामुळे त्यांची वरिष्ठ मंडळीही त्यांना वचकून असायची. काका मूळ रत्नागिरीचे. तिथे त्यांचं घर आणि थोडीफार जमीनही आहे. त्यामुळे ते अर्थातच अस्सल कोकणी म्हणायला हरकत नाही. एकूणच आयुष्य निरपेक्ष गेल्यामुळे असेल, त्यांचा स्वभाव ‘बाणेदार’ या व्याख्येत बसत असावा. अंगात उत्तम संस्कार भिनलेले असूनही कुठे चूक आढळली किंवा कुणी चुकीचं वागताना दिसलं की, यांची तळपायाची आग मस्तकात गेलीच म्हणून समजा. अशा वेळी ते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता त्याला सुनावून स्वत:ला आणि त्यालाही ‘मोकळं’ करून टाकायला मागेपुढे पाहत नाहीत.

कुणी आजारी असेल तर थेट त्याच्या घरी जाऊन चौकशी करणार, होईल तेवढी मदत करणार. त्याच्या शक्तीबाहेर असेल तर दुसऱयाला गळ घालून मदत पोहोचती करणार. कुणी मुजोरपणा करायला लागला की, त्याला खडे बोल सुनावणारच.

काका रत्नागिरीला नेहमीच जात असतात. रत्नागिरीवर त्यांचं प्रचंड प्रेम! आणि तिथे त्यांना नेणारे टॅक्सीचालक श्री. पाटील यांच्यावरही! काकांना तिकडे जायचं आहे एवढं कळलं तरी हातातलं काम सोडून पाटील त्यांच्या घरी हजर होत.

आज काका पंचाहत्तर वर्षांचे असले तरी कसलीही व्याधी नाही, कुठेही जायचा कंटाळा नाही. कधीही पहा, हे तुरुतुरु चालताना दिसतात. या वयात लागणाऱया व्याधी… सांधेदुखी, गुडघेदुखी यांच्या वाऱयालाही फिरकलेल्या नाहीत. त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असूनही मी त्यांच्या समोर वृद्ध दिसतो यात सगळं आलं. सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसणाऱया आणि कायम सात्त्विक आहार असलेल्या या ‘तरुण’ माणसाला दीर्घायुष्य लाभो एवढंच त्यांच्यासाठी देवाजवळ मागणं आहे. एरवी ते कुणाकडून काही घेतच नाहीत म्हणून हे परस्पर त्यांना देणं आहे.

[email protected]