दुसरीकडे असला तर मळ आणि तुमच्याकडे आला तर कमळ, ही तर भ्रष्ट जनता पार्टी! उद्धव ठाकरे यांनी भाजपची सालटी काढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांनी पुण्यात येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगल-बगलमध्ये कोण बसणार? मोदी येणार, गद्दारांच्या रांगेत बसणार आणि ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांचा सत्कार करणार. हेच का तुमचे हिंदुत्व, असा सवाल करतानाच दुसरीकडे असला तर मळ आणि तुमच्याकडे आला तर कमळ? हा कुठला न्याय? अरे तुमची तर भ्रष्ट जनता पार्टी आहे, असे जबरदस्त तडाखे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावले. ठाण्यात आज गडकरी रंगायतनमध्ये हिंदी भाषिकांचा प्रचंड हाऊसफुल्ल गर्दीत मेळावा झाला. या दणदणीत मेळाव्यात खणखणीत ठाकरी फटकारे लगावत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि गद्दारांची सालटीच काढली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज ठाण्यातील रामगणेश गडकरी रंगायतन नाटय़गृहात हिंदी भाषिक कार्यकर्त्यांचा प्रचंड गर्दीत तुफान मेळावा झाला. सभागृह गर्दीने ओव्हरपॅक झाले होते. उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच हिंदी भाषिक बांधवांनी उभे राहून वज्रमूठ वळत उद्धव ठाकरे यांचे घोषणांच्या गर्जनेत स्वागत केले.

हिंदीत भाषण करू की मराठीत करू असे सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी विचारताच अवघ्या गर्दीतून दोन्ही भाषांमधून बोला, आम्हाला मराठी कळते.. आम्ही मराठीच आहोत, असा आवाज घुमला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी यालाच म्हणतात हिंदुत्व. असे सांगताच टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला. ते पुढे म्हणाले, आमच्या वज्रमूठ सभेला सर्वजातीचे लोक आले होते. तेव्हा या नकली हिंदूंनी आमच्या सभास्थळी जाऊन गोमूत्र शिंपडलं. अरे माणसासारखी माणसं सभेला आली होती. आणि त्यांना तुम्ही अपवित्र मानता? हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकारला ठणकावले.

महाराष्ट्राच्या माजी राज्यपालांना मणिपुरात पाठवा
मणिपूर जळतंय.. हेच का आपलं हिंदुराष्ट्र? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. राष्ट्रपतीपदी एक महिला बसल्या आहे. त्या काय करत आहेत? मी महामहिम राष्ट्रपतींना विचारतो. राष्ट्रपती महोदया, तुम्ही ज्या देशाच्या राष्ट्रपती आहात त्या देशातील महिलांची अब्रू भररस्त्यात लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत का? तिथल्या मणिपूरमधल्या राज्यपाल महिला आहेत. त्याही काही करत नाहीत. आमच्या इथे एक राज्यपाल होते. ते कशी मस्ती करत होते? त्यांना पाठवा तिथे. मंदिर उघडा, हे उघडा, ते उघडा असे सांगत होते. असले राज्यपाल तिथे का पाठवत नाहीत, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

सुनो द्रौपदी अब गोविंद ना आऐंगे
मणिपूरच्या घटनेचा संदर्भ देत यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुष्यमित्र उपाध्याय यांची कविताच वाचून दाखवली.
सुनो द्रौपदी, शस्त्र उठालो,
अब गोविंद ना आऐंगे,
छोडो मेहंदी खडग संभालो,
खुद ही अपना चीर बचालो,
द्युत बिछाए बैठे शकुनी,
मस्तक सब बिक जाएंगे
सुनो द्रौपदी, शस्त्र उठालो,
अब गोविंद ना आऐंगे

ही कविता उद्धव ठाकरे यांनी वाचताच भारत माता की जय, शिवसेना झिंदाबाद अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

उत्तर भारतीयांशी आमचे घट्ट नाते
उत्तर भारतीयांसाठी मी काय केलं, अशी टीका विरोधक करतात. पण मी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा भेदभाव करू शकलो असतो. मात्र कोरोनाच्या काळात हजारो उत्तर भारतीय बांधवांना महाराष्ट्र सरकारने खर्च करून एसटी, रेल्वेने त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडलं. त्यांच्यासाठी डॉक्टरांची व्यवस्था केली, आजारी बांधवांवर उपचार केले. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली. हे बांधव त्यांच्या गावाकडे सुखरूप पोहोचले. म्हणूनच मी सांगतो की, उत्तर भारतीयांसोबत आमचे एक वेगळे आणि घट्ट नाते आहे, जे कोणी प्रश्न विचारतील त्यांना उत्तर भारतीयच उत्तर देतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळय़ांचा गजर झाला.

परदेशात मोदी ‘इंडियन मुजाहिद्दीन’चे प्रतिनिधित्व करतात काय?

सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली. तिचं नाव इंडिया असे ठेवले आहे, पण पंतप्रधान म्हणतात, मी विरोधी पक्षांची एकजूट मानतच नाही. ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या अतिरेकी संघटनेच्या नावातही इंडिया आहे असे मोदी म्हणाले. मग तुम्ही जेव्हा परदेशात जाता ते या ‘इंडियन मुजाहिद्दीन’चे प्रतिनिधित्व करता काय, असा रोकडा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

या मेळाव्यास आयोजक खासदार राजन विचारे, उपनेते विजय कदम, उपनेत्या अनिता बिर्जे, ज्योती ठाकरे, अल्ताफ शेख, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, कृष्णकुमार कोळी, नरेश मणेरा, विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी, प्रभाकर म्हात्रे, रेखा खोपकर, समिधा मोहिते, आकांक्षा राणे, रंजना शिंत्रे, प्रवक्ते आनंद दुबे, चंद्रभान आझाद, अनिश गाढवे, सहप्रवक्ते तुषार रसाळ, राजेश सिंह, प्रदीप शिंदे, सचिन चव्हाण, संजय तरे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे आदी उपस्थित होते.

आमची अस्सल शिवसेना.. बाजारात चायनीज माल

50 खोके एकदम ओक्के अशा घोषणा घुमल्या तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला ते तुम्हाला न्याय काय देणार? ते पुढे म्हणाले, ठाणेकर आणि शिवसेनेचे नाते अतूट आहे. ठाण्यात शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकला. ठाण्यात आहे ती आमची अस्सल शिवसेना, बाकी बाजारात चायनीज माल आला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच प्रचंड हशा उसळला. शिवसेनाप्रमुखांनी ठाणेकरांना गडकरी रंगायतनची भेट दिली, पण आता नाटके काही वेगळी लोपंच करताहेत, आजचा हा जोश पाहून त्यांचे होश उडतील, असे सांगत त्यांनी मिंधे गटाचा समाचार घेतला.

तख्त बदलेंगे, ताज बदलेंगे, गद्दारों का राज बदलेंगे

ठाणे शहराचा अर्थ म्हणजे निष्ठा. गडकरी रंगायतनमध्ये आज तिच निष्ठा, श्रद्धा आणि ताकद एकवटली आहे. ही गर्दी पाहून काही लोकांना लवकरच ठाणे सोडून पळून जावे लागेल, असे सांगतानाच तख्त बदलेंगे, ताज बदलेंगे, गद्दारों का राज बदलेंगे, असा नाराच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत यांनी आपल्या तडाखेबंद भाषणाला सुरुवात करताच उत्तर भारतीय बांधवांनी पन्नास खोके.. एकदम ओके.. अशा गगनभेदी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर खासदार राऊत म्हणाले, हिंदी में बोलेंगे, पचास खोके और खोकेवालों को ठोके. आम्ही ठाण्यात येणार.. येतच राहणार. कारण हे शहर आमचे आहे. ठाण्याचे नाव काढलं की, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाचे रोमांच उभे राहतात. ठाणे हे मर्दांचे शहर होते. डरपोकांचे शहर असे नाव आम्ही कधीच ऐकले नाही. आनंद दिघे यांच्याकडे पाहून आम्हाला हिंमतच यायची. कोणत्याही संकटाशी सामना करत बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून ते उभे राहिले, पण काही पळपुटे पळून गेले. संकटात पळून जातो तो नामर्द असतो, असे तडाखे संजय राऊत यांनी लगावले.

गद्दारांना धडा शिकवण्याची सुरुवात ठाण्यातून होईल

महाराष्ट्र असो व उत्तर प्रदेश.. या दोन्ही राज्यांनी कधी विश्वासघातक्यांना थारा दिला नाही. त्यामुळे गद्दारांना गाडण्याची सुरुवात ठाण्यातूनच होईल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केला. आपली लढाई सन्मानासाठी आहे. त्यासाठी उत्तर भारतीयांनो, मराठी माणसाच्या खांद्याला खांदा लावून एकत्र या. महागाई, भ्रष्टाचार तसेच महिलांच्या सन्मानावर मूग गिळून गप्प बसणाऱयांना धडा शिकवण्याची हीच वेळ असून आगामी निवडणुकांमध्ये मतदान करताना ईव्हीएम मशीनवर असे बटण दाबा की त्याचा आवाज दिल्लीपर्यंत जाईल, असे आवाहनदेखील प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.

जिकडे अन्याय तिकडे शिवसेना – प्रभाकर सिंह
शिवसेनेचा जन्मच अन्यायाविरोधात लढण्यासाठी झाला आहे. जिकडे अन्याय तिकडे शिवसेना हे समीकरण आहे. आता खरी लढाई आपल्याला लढायची आहे. उत्तर भारतील लोक उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर आहेत आणि नेहमी राहतील, असा विश्वास यावेळी हिंदी भाषिक कार्यकर्ता संमेलनाचे प्रभाकर (पप्पू) सिंह यांनी व्यक्त केला.