
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत मुंबईत होणाऱया सामन्यांचे क्रिकेट दर जाहीर करण्यात आले असून क्रिकेटप्रेमींना एक हजार रुपयांत सामना पाहता येणार आहे. मात्र या तिकिटांची संख्या दोन हजारांच्या आसपास असल्यामुळे ही तिकिटे मिळविणारा क्रिकेटप्रेमी खऱया अर्थाने भाग्यवानच असेल. तसेच सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या बॉक्सेसचे दर कमाल 45 हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य नऊ स्टेडियम्सच्या तुलनेत वानखेडे स्टेडियमच्या तिकिटांचे दर सर्वात महागडे असणार हे स्पष्ट झाले आहे.
आज मुंबई क्रिकेट संघटनेच्या झालेल्या बैठकीत सचिव अजिंक्य नाईक, संयुक्त सचिव दीपक पाटील, कोषाध्यक्ष अरमान मलिक, सीईओ सीएस नाईक, ऍपेक्स कौन्सिल सदस्य मिलिंद नार्वेकर, अभय हडप, नीलेश भोसले यांनी तिकिटांचे दर निश्चित केले.
वानखेडे स्टेडियमचे वर्ल्ड कप सामन्यांचे तिकीट दर
तें.-वें. स्टॅण्ड (ले 1) 2500 2500 4000 2500 5000
तें.-वें. स्टॅण्ड (ले 2) 2000 2000 3000 2000 4000
तें.-वें. स्टॅण्ड (हॉ. ले 2) 10000 10000 30000 10000 40000
गावसकर स्टॅण्ड (ले 1) 1000 1000 1500 1000 2500
गावसकर स्टॅण्ड (ले 2) 2500 2500 3500 2500 4500
मर्चंट स्टॅण्ड (ले 1) 2000 2000 3000 2000 4000
मर्चंट स्टॅण्ड (ले 2) 2500 2500 4000 2500 5000
दिवेचा पॅव्हेलियन 2500 2500 3500 2500 5000
हॉस्पिटॅलिटी बॉक्सेस 35000 35000 40000 35000 45000
(इं. – इंग्लंड, द.आ. – द. आफ्रिका, बां. – बांगलादेश, हिं. -हिंदुस्थान,
ऑ. – ऑस्ट्रेलिया, अफ. – अफगाणिस्तान, श्री. – श्रीलंका)
सिंगल नव्हे तिकिटांची कोम्बो ऑफर
वर्ल्ड कपच्या सर्व सामन्यांना गर्दी व्हावी आणि सर्व तिकिटे विकली जावीत म्हणून एमसीएने यंदा वर्ल्ड कपच्या सामन्यांची कोम्बो तिकिटे ठेवली आहेत. क्लब, संस्था, बीसीसीआय, आयसीसी आणि जाहिरातदारांना दिली जाणारी तिकिटे ही सरसकट पाच सामन्यांची दिली जाणार आहेत. म्हणजे कुणालाही एका सामन्याचे तिकीट मिळणार नाही. सर्वच्या सर्व पाच सामन्यांची तिकिटे घ्यावी लागणार आहेत. मात्र सामान्य क्रिकेटप्रेमींसाठी सर्व सामन्यांची तिकिटे घेणे बंधनकारक असेल की नाही, याबाबत एमसीए विचार करणार आहे.
तिकिटे सहज उपलब्ध होणार
हिंदुस्थानचा सामना आणि उपांत्य लढत वगळता अन्य तिन्ही सामन्यांची तिकिटे सहज उपलब्ध होतील, असे एमसीएच्या सूत्रांकडून कळले आहे. वर्ल्ड कपची क्रेझ पाहता केवळ हिंदुस्थानचा साखळी सामना आणि उपांत्य फेरीच्या तिकिटांसाठी मुंबईकरांमध्ये तिकिटे मिळविण्यासाठी झुंबड उडणार हे निश्चित आहे. मात्र हे दोन्ही सामने वगळता अन्य सामन्यांना मुंबईकरांचा प्रतिसाद सामान्य लाभण्याची शक्यता असल्यामुळे या सामन्यांचे दर कमी ठेवण्यात आले आहेत आणि या सामन्यांची जास्त तिकिटे ऑनलाईन उपलब्ध असतील. येत्या 10 ऑगस्टपासून ऑनलाईन तिकीटविक्री सुरू होण्याची शक्यता आहे.
वानखेडे स्टेडियमचे दर सर्वात महागडे
गेल्याच आठवडय़ात ऐतिहासिक इडन गार्डन्सच्या तिकिटांचे दर जाहीर करण्यात आले होते. ते दर 650पासून 3000पर्यंत ठेवण्यात आले आहेत. मात्र वानखेडेच्या तिकिटांचे दर 1000पासून 45 हजार रुपयांपर्यंत आहेत. हिंदुस्थानात सर्वात महागडे दर वानखेडे स्टेडियमवर असतील. वानखेडेवरील किमान 25 हजार तिकिटांचे दर हे 1 ते 5 हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. फक्त सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या हॉस्पिटॅलिटी बॉक्सेसचे दर 10 हजारांपासून 45 हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत.


























































