पंढरपुरात पैसे घेऊन श्री विठ्ठलाचे शॉर्टकट दर्शन; दोन दलाल ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैसे घेऊन शॉर्टकट मार्गाने दर्शन देणारे रॅकेट श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा उघडीस आले असून, पोलिसांनी दोन एजंटांना ताब्यात घेतले आहे. शॉर्टकट दर्शनासाठी प्रतिव्यक्ती हजार रुपये घेतल्याची तक्रार मंदिर प्रशासनाकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शंतनू उत्पात आणि सागर बडवे (रा. पंढरपूर) अशी ताब्यात घेतलेल्या एजंटांची नावे आहेत. हैदराबाद येथील भाविक विनोद उपुतल्ला आणि त्यांच्या पत्नी श्रीशा हे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. हे दाम्पत्य एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाला झटपट दर्शनाबाबत विचारल्यावर त्यांनी शंतनू उत्पात याचा नंबर दिला होता. उत्पात याने सागर बडवे याला जोडून दिल्यावर या दाम्पत्याला घेऊन सागर बडवे मंदिरात गेला आणि त्याने मंदिरातील संबंधितांना सांगून या दोघांना दर्शनाला पाठविले.

दरम्यान, मंदिर सुरक्षाव्यवस्थेवर असणाऱया वामन येलमार या पोलीस कर्मचाऱयाला याचा संशय आल्यावर त्याने या दाम्पत्याला थांबवून त्यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी दोघांचे दोन हजार रुपये देण्याचे मान्य करून दर्शनाला आल्याचे त्यांनी सांगितले. येलमार यांनी या भाविकांना व्यवस्थापकांकडे आणून त्यांच्यासमोर त्यांचे जबाब घेतले.

श्री विठ्ठल मंदिराचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना उत्पात आणि बडवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, बडवे आणि उत्पात यांच्यासह अनेक एजंट विविध हॉटेलमधील पैसेवाल्या भाविकांना अशा पद्धतीने पैसे घेऊन दर्शन घडवीत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. या एजंटांचे मंदिर व्यवस्थापनाशी लागेबांधे असल्याने याचा तपास वरिष्ठ पातळीवरून करण्याची भाविकांची मागणी आहे.

आज सापडलेल्या एजंटांच्या माणसांना दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापनातील कोणाच्या आदेशाने सोडले? हा प्रश्न आहे. तसेच ‘व्हीआयपी दर्शन’च्या नावाखाली असे रोज कित्येक भाविकांना सोडण्यात येत असल्याने मंदिराचे सीसीटीव्हीसह, कर्मचारी आणि एजंटांचे मोबाईल यांची तपासणी केली, तर श्री विठ्ठल मंदिरातील दर्शनाचा काळाबाजार समोर येऊ शकणार आहे.

आयएएस अधिकारी प्रशासकपदी हवा

मंदिर समितीची मुदत संपून दोन वर्षे झाली, तरी गेल्या सहा वर्षांपासून एकाच जागेवर व्यवस्थापक असल्याने सध्या मंदिरात असले प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. शासनाने मंदिराच्या चौकशीसाठी एखाद्या आयएएस अधिकाऱयाला तातडीने प्रशासक म्हणून नेमणूक होण्याची गरज आहे. तरच दर्शनाच्या काळाबाजारासोबत मंदिराच्या टेंडरचे घोटाळे आणि बरेचकाही उजेडात येईल, अशा भावना वारकऱयांमधून व्यक्त होत आहेत.