
मी प्रचंड कष्टातून माझ्या स्वप्नातील भव्य स्टुडिओ साकारला. पण ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्या ईसीएल फायनान्स, एडलवाइझ कंपनीचे केयूर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर. के. बन्सल आणि इन्सॉल्वन्सी अधिकारी जितेंद्र कोठारी यांनी माझा स्टुडिओ लुटण्याचा आणि माझी नाचक्की करून मला घेरण्याचा डाव आखला. या लोकांनी माझी वाट लावली आणि षड्यंत्र करून दडपून टाकत मला संपवले, अशी सुसाइड नोट प्रख्यात दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केल्याचे आज समोर आले.पोलिसांनी नेहा देसाई यांचा जबाब नोंदवला असून 11 पानांचा एफआयआर दाखल केला आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाले?
– रशेष शहा हा गोडबोल्या असून अनेक छोटय़ामोठय़ा उद्योजकांसाठी मी कष्टाने बनवलेला स्टुडिओ त्याने गिळण्याचे काम केले.
– मी त्याला शंभर फोन केले. परंतु त्याने उचलले नाही. आर्थिक गुन्हे शाखा, एनसीएलटी कोर्ट, डीआरटी यांच्याकडून माझा प्रचंड छळवाद केला.
– माझ्याकडे दोन-तीन इन्व्हेस्टर गुंतवणूक करण्यासाठी तयार असताना मला सहकार्य केले नाही. माझ्यावर डबल, टिबल कर्जाचा बोझा टाकून मला प्रेशर केले जात होते.
– स्मित शहा, केयूर मेहता, आर. के. बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटण्याचा, माझी नाचक्की करण्याचा आणि मला घेरण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी माझी वाट लावली.
– मला पैशांसाठी धमक्या देऊन या नराधमांनी माझ्यावर दबाव आणला. सोन्यासारखे असलेले माझे ऑफिस विकायला लावले. एका मराठी कलाकाराला जीवे मारण्याचे काम या नराधमांकडून केले जात आहे.
– मला षड्यंत्र करून दडपून टाकत मला संपवण्यात आले.
29 जुलैला बाऊन्सर्स आणून एडलवाइझ कंपनी स्टुडिओ बळकावणार होती
ज्या जितेंद्र कोठारींना एनसीएलटी कोर्टाने स्टुडिओचे प्रशासक म्हणून नेमले ते कोठारी एडलवाइझ कंपनीच्या इशाऱयावर काम करत होते. 29 जुलैला मोहर्रमची सुट्टी असूनही जितेंद्र कोठारी यांनी फोन केला. मी खासगी बाऊन्सर आणून स्टुडिओचा ताबा घेणार आहे ही धमकी त्यांनी दिली. याचाच अर्थ 29 जुलैला एडलवाइझ कंपनी स्टुडिओ बळकावणार होती, असा स्पष्ट जबाब नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा यांनी खालापूर पोलिसांकडे नोंदवला आहे.
नेहा देसाई यांचा जबाब…
– 2004 साली कर्जतला एनडी स्टुडिओची स्थापना केल्यानंतर आम्ही सुरुवातीला व त्यानंतर घेतलेली कर्जाची परतफेड मुदतीत केली आहे. नितीन देसाई यांचा कर्ज घेऊन फसवण्याचा कधीच हेतू नव्हता.
-2016 मध्ये ईसीएल फायनान्स, एडलवाइझ गुप या कंपनीने आम्हाला कर्जाची ऑफर दिली. एडलवाइझ कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांनी मोठी स्वप्ने दाखवली व गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला.
– 2016 मध्ये 150 कोटी तर 2018 मध्ये 135 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी दिले. हे कर्ज देताना एनडी स्टुडिओची जमीन तारण ठेवण्यात आली.
– आम्ही कर्जाचे हप्ते मुदतीत भरत असतानाही एडलवाइझ कंपनीने एप्रिल 2019 मध्ये माझे पती नितीन देसाई यांना आगाऊ सहा महिन्यांचे हप्त्याचे पैसे भरण्यासाठी दबाव टाकला.
– वन टाईम सेटलमेंटचे आश्वासन देत ईसीएल फायनान्स, एडलवाइझ कंपनीने अनेक महिने चालढकल केली. त्यामुळे कर्जाच्या व्याजाची रक्कम वाढली आणि त्यानंतर पूर्वकल्पना न देता ईसीएल कंपनीने आम्हाला अंधारात ठेवून एनसीएलटी कोर्टात धाव घेतली.
– 2023च्या मार्च महिन्यात माझे पती माझ्यासमोर रडले आणि हे लोक स्टुडिओ गिळण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मला जीवन जगणेही असह्य झाले आहे, असे म्हणाले.
– 28 जुलै रोजी कोठारी यांनी कंपनीत मेल करून कागदपत्रांची मागणी केली. 29 जुलैला मोहर्रमची सुट्टी असतानासुद्धा जितेंद्र कोठारी कंपनीतील काही लोकांना फोन करून मी बाऊन्सर घेऊन येत आहे आणि स्टुडिओचा ताबा घेणार आहे असे सांगत होते. याचाच अर्थ 29 जुलैला एडलवाइझ कंपनी एनडी स्टुडिओचा ताबा घेण्याच्या तयारीत होती.
– हे सगळे पाहिल्यानंतर नितीन देसाई प्रचंड तणावाखाली गेले. स्टुडिओ आणि स्टुडिओच्या जागेवर असलेला कलामंच गिळंकृत करून त्या जागेवर खासगी व्यावसायिक बांधकाम करण्याचा त्यांचा कुटील हेतू होता हे स्पष्ट झाले.
– फायनान्स कंपनीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे व्यावसायिक प्रोजेक्ट बंद पडले. नवीन प्रोजेक्ट येण्यास अडचणी येऊ लागल्या. या सर्व कारणांमुळे सुमारे 100 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे माझे पती नितीन देसाई यांनी सांगितले.
– नितीन देसाई यांनी फायनान्स कंपनीचे कर्ज फेडण्याची तयारी दाखवूनही फायनान्स कंपनीचे केयूर मेहता, रशेष मेहता, स्मित शहा, आर. के. बन्सल व प्रशासक जितेंद्र कोठारी यांनी माझ्या पतीला कर्जाच्या वसुलीसाठी प्रचंड मानसिक त्रास दिला. या जाचाला कंटाळूनच त्यांनी माझ्या पतीला आत्महत्या करण्यास भाग पाडले.





















































