सत्याचा शोध – युगानुयुगे उभा अन्यायाच्या द्वारी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रसेन टिळेकर

कोणत्याही न्यायालयीन प्रकरणाचा निकाल ही वेळखाऊ प्रक्रिया असते. वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात वेळ जाऊ नये याकरताच  माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावोगावी ‘तंटामुक्ती अभियान’ सुरू केले होते आणि त्याला काही काळ चांगले यशही आले होते. परिणामी ग्रामीण पोलिसांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. कारण पारी पोलीस स्टेशनला न जाता परस्पर या तंटामुक्ती अभियानात मिटवल्या जात. असे हे तंटामुक्ती अभियान अधिक प्रबळ कसे होईल यासाठी महाराष्ट्र सरकारने कृती करणे अगत्याचे आहे.

स्थळ : शिवाजीनगर कोर्ट, पुणे 

वेळ : टळटळीत दुपारची

कोमेजलेले, सुरकुतलेले चेहरे, जीर्ण झालेल्या हातात तितकीच जीर्ण झालेली कागदाची बाड घेऊन इथे तिथे बसलेले जख्ख म्हातारपण. संतांच्या या भूमीत जिथे महिन्याकाठी कुठल्या ना कुठल्या देवाच्या नावाने दिंडय़ा, पालख्या, उरूस आणि इतर नाना तऱहेचे धार्मिक उत्सव दिनी प्रतिदिनी गावात, आडगावात साजरे केले जातात, जिथे भक्तीचा प्रचंड धुरळा उडत असतो, त्या भूमीवरची माणसे इतक्या मोठय़ा प्रमाणावर कोर्टात वाद घालायला येऊच कशी शकतात? हा खरं तर कुठल्याही विचारी माणसाला पडेल असाच प्रश्न आहे. काय असतील या खेडुतांची गाऱहाणी? अंगात अजिबात त्राण नसलेली ही माणसे किती वर्षे न्यायालयाच्या पायऱ्या चढत असतील? देवधर्म पाळणारी ही माणसे आपले प्रश्न आपापसात सोडवू शकत नाहीत का? वादी आणि प्रतिवादी एकाच गावातून आलेले असतात. एकच देवता, ग्रामदेवता पुजत असतात. मग यांचा भक्तिमार्ग यांना काहीच चांगला मार्ग दाखवत नाही का ? निदान 20-25 वर्षे न्यायालयात खेटे घालूनही न्याय पदरात पडत नसेल तर न्यायालयाचे तोंडही बघणार नाही असा दृढनिश्चय का करीत नाहीत ही मंडळी? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये हे आपल्या पूर्वजांचे वचन यांनी ऐकलेले नाही का? कोर्टात दाद मागायला येणाऱ्यांना असे जर्जर करणाऱ्या आपल्या न्यायव्यवस्थेला तरी आपण काय म्हणावे, न्यायालय की अन्यायालय? इतर देशांतील न्यायालये  अशीच गोगलगायी पद्धतीने काम करीत असतील का?

अशा सगळ्या प्रश्नांचे वारे डोक्यात भिरभिरत असताना कोर्टातीलच एका झाडाच्या पारावर बसलेल्या साठी-पासष्टीच्या वृद्धाकडे लक्ष गेले. डोक्याला हात लावून बसलेल्या त्या माणसाच्या जवळ मी मुद्दामच जाऊन बसलो आणि त्याला प्रश्न केला, “बरेच  चिंताग्रस्त दिसताय? कसली केस चालली आहे म्हणायची?” तसे ते म्हणाले ,

“चालली नाही बाबा, संपली एकदाची”

“अरे वा, किती वर्षांनी संपली?”

“चौदा वर्षांनी संपली बाबा एकदाची. चौदा वर्षांचा वनवास भोगला.”

 “निकाल तरी तुमच्या बाजूने लागला का?”

“कसला कप्पाळाचा बाजूने निकाल? बाबा, कोर्टाने माझी केसच डिसमिस करून टाकली.”

“केस डिसमिस? कुठल्या मुद्दय़ावर?”

“कोर्टाचं म्हणणं पडलं की, मी दावा मुदतीत दाखल केला नाही.”

“मुदतीत म्हणजे?”

“दावा वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपाचा होता. आज्याने सगळी दहा एकर जमीन त्यावेळच्या पद्धतीने जेष्ठ चिरंजीवांच्या नावावर म्हणजे माझ्या चुलत्याच्या नावावर केली होती. पुढे चुलत्याने परस्पर खातेवाटप करून अवघी दोनच एकर माझ्या वडिलांच्या नावावर केली, पण संशय येऊ नये म्हणून सगळी पाच एकर त्यांच्या ताब्यात देऊन कसायला सांगितली. वडील अडाणी, हिंदू संस्कृतीप्रमाणे थोरल्या भावाला वडिलांच्या जागी मानणारे. त्यांनी उरलेली तीन एकर जमीन नावावर करून घेतली नाही. इतकंच काय पण वहिवाट सदरीही आपलं नाव लावून घेतलं नाही. तलाठी कसलीही चौकशी न करता वहिवाटच्या रकान्यात ‘खुद्द’ असं लिहायचा. खुद्द म्हणजे ज्याच्या नावावर जमीन आहे तो. काळाच्या ओघात वडील व चुलते देवाघरी गेले. चुलत्याच्या मुलांनी कानावर हात ठेवले. शेवटी कोर्टाची पायरी चढावीच लागली, तर कोर्टाने हा निकाल दिला.”

“कोर्टाने केस डिसमिस करताना कारण तरी काय दिलं?”

“कोर्टाचं म्हणणं पडलं की, तुमचा वाटा तुम्हाला पूर्ण मिळाला नव्हता तर खातेफोड झाल्यापासून बारा वर्षांच्या आत तुम्ही कोर्टाकडे दाद मागायला पाहिजे होती. आता तीस वर्षे होऊन गेली तेव्हा हा दावा मुदतीत बसत नाही.”

“तुमच्या वकिलाने ही अडचण तुम्हाला सांगितली नाही का?” वकिलाचा विषय काढताच म्हातारबाबांनी जे उद्गार काढले ते या ठिकाणी देण्यासारखे नाहीत.

“अहो, तो म्हणाला, ही तुमची वडिलोपार्जित जमीन आहे. हिचे वाटप तुम्ही शंभर वर्षांनी मागू शकता. इथे मुदतीची अट लागू पडत नाही. सरळ सरळ खोटं बोलून पैसे मात्र उकळले माझ्याकडून.”

वकिलाने नक्कीच त्या शेतकऱ्याची दिशाभूल केली होती. वडिलोपार्जित वाटप केव्हाही करता येते हे अर्धसत्य आहे. अजिबातच वाटप झाले नसेल तर ते शंभर वर्षांनीही करता येते, पण थोडे जरी वाटप झाले असेल आणि त्याअन्वये थोडी का होईना, जमीन नावावर झाली असेल तर उरलेली बारा वर्षांच्या आत ती तुम्ही तुमच्या नावावर करून घेतलीच पाहिजे अन्यथा तुमचा हक्क त्या जमिनीवर राहत नाही. तेव्हा अर्धवट वाटप झाले असेल तर ते बारा वर्षांच्या आत पुरे करावे लागते हे काय वकिलाला माहीत नसते?

मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की, कुठल्याही सरकारी कार्यालयात सुपूर्द केलेली कागदपत्रे  जर अपूर्ण असतील, व्यवस्थित नसतील तर अर्ज किंवा पार मुळी दाखलच करून घेत नाहीत. मग इथे कोर्टातल adस्ग्हग्stratग्न डिपार्टमेंट म्हणजे ज्या न्यायाधीशाच्या हाताखाली दावा चालणार असतो त्यांच्याशी निगडित असलेले प्रशासकीय कारकून ही त्रुटी कोर्टाच्या नजरेस का आणून देत नाहीत? म्हणजे एखादा दावा मुदतबाह्य आहे असे कोर्टाच्या नजरेस का आणून देत नाहीत? सगळ्यात महत्त्वाचे, हा दावा मुदतबाह्य आहे हे लक्षात यायला खुद्द न्यायाधीशाला तरी चौदा वर्षे का लागावीत? इतक्या साध्या गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी  कोर्ट चौदा वर्षे घेत असेल तर थोडय़ा किचकट खटल्यांना चाळीस-पंचेचाळीस वर्षे लागावीत यात नवल ते काय ?

 कुणालाही असा प्रश्न पडेल की, इतक्या मोठय़ा प्रमाणावर जर आमचा  शेतकरी शेतावर जाण्याऐवजी वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजवत राहिला तर त्याचे, त्याच्या कुटुंबाचे नुकसान तर आहेच, पण देशाचेही आहे! मी चुकत नसेल तर मला वाटते, यासाठीच माजी गृहमंत्री मा. आर. आर. पाटील यांनी गावोगावी ‘तंटामुक्ती अभियान’ सुरू केले होते आणि त्याला काही काळ चांगले यशही आले होते. परिणामी ग्रामीण पोलिसांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. कारण पारी पोलीस स्टेशनला न जाता परस्पर या तंटामुक्ती अभियानात मिटवल्या जात. उघड आहे की, या काळात कोर्टात केसेसही  कमी गेल्या असतील आणि कोर्टाचा वेळ वाचला असेल. तेव्हा अत्यंत उपकारी असे हे तंटामुक्ती अभियान अधिक प्रबळ कसे होईल यासाठी महाराष्ट्र सरकारने कृती करणे अगत्याचे आहे.

[email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत)