आरोग्य जपणारी योगसखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनघा सावंत

‘‘नव्या दृष्टीतून बघा जुनी परंपरा, समृद्ध संस्कृती जतन करा!’’ असे आवाहन करणारे डोंबिवली येथील ‘योगसखी महिला मंडळ’ विविध आणि अनोख्या उपक्रमांच्या माध्यमातून गेली 21 वर्षे संस्कारांचा ठेवा जतन करत आहे.

‘नारीर् नारीते वृद्धी, नारीर् नारीते सिद्धी…’ म्हणजेच ‘नारीची नारित्वातच वृद्धी आणि नारीची नारित्वातच सिद्धी’ या उक्तीची जाणीव ठेवून साकारलेले आमचे ‘योगसखी’ मंडळ. योगासाठी काही, तर योगायोगाने काही सख्या एकत्र आल्या आणि धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक सेवेच्या उद्दिष्टांनी 2002 मध्ये ‘योगसखी’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्त्राrची उन्नती व्हावी हा ‘योगसखी’चा हेतू आहे. ‘योगसखी’ महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सजगतेसाठी सातत्याने प्रयत्नशील असते, असे या मंडळाच्या संस्थापिका रोहिणी पेंढारकर यांनी सांगितले.

मंडळ ‘हिंगणे स्त्राr शिक्षण संस्था’ येथे भाऊबीज निधी म्हणून देणगीस्वरूपात मोलाची मदत करते. याशिवाय मंडळातर्फे गरजू, एकल महिलांना तसेच शैक्षणिक उपक्रमांतर्गत माहितीतील गरीब आणि गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत केली जाते.
निवेदनाची कार्यशाळा, व्याख्याने, कर्तबगार स्त्रियांच्या मुलाखती, कथाकथन याबरोबरच महिला जागृतीसाठी वेदकालीन स्त्रियांच्या जीवनपटाचा आढावा, आत्मचरित्रातील स्त्राr जीवनाचा आढावा यांसारखे आगळेवेगळे कार्यक्रम मंडळाने घेतले आहेत.

मंडळाने श्री गणपती अथर्वशीर्ष सहस्रावर्तने, रुद्रपठण, विष्णुसहस्रनाम, शिवमहिम्न स्तोत्र पठण, दत्तजयंतीनिमित्त भजन संध्येचा कार्यक्रम, सोळा संस्कारांवर आधारित चर्चासत्र, श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ इ. कार्यक्रम नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे आणि धार्मिक उद्दिष्टाने केले आहेत. तसेच मंडळातर्फे नवरात्रोत्सवात श्रीसूक्त, देवीसूक्त, देवी अथर्वशीर्ष स्तोत्र, देवीची गाणी, जोगवा, गोंधळ इ. देवींविषयक माहिती देणारे कार्यक्रम मोठय़ा भक्तिभावाने साजरे केले जातात.

मंगळागौर हा मंडळाचा अतिशय जिव्हाळ्याचा भाग असून मंडळ 2007 पासून सातत्याने मंगळागौरीचे कार्यक्रम करीत आहे. वेगवेगळ्या संस्थांमार्फत होणाऱया मंगळागौर स्पर्धेत मंडळाने नेहमीच प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच उखाणे स्पर्धा आणि नृत्यनाटय़ स्पर्धांवरही मंडळाने मोहोर उमटवली आहे. मंडळाची ही घोडदौड कौतुकास्पद बाब आहे.

‘योगः कर्मसु कौशलम’ या वचनाप्रमाणे ‘योगसखी’ने योगाला जीवनात महत्त्वाचे स्थान दिले आहे. तसेच जागतिक योगदिनही मंडळ उत्साहात साजरा करते. ‘‘जुन्या तसेच नव्या पिढीनेही ‘योगसखी’ला आनंदाने स्वीकारले. सर्व वर्गांतून मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला. आम्ही सतत नवनवीन उपक्रम घेऊन येण्यास प्रयत्नरत राहिलो आणि पुढेही राहू. वैविध्याने नटलेल्या उपक्रमांमुळेच आम्ही वेगळे स्थान निर्माण केले, असे आहे,’’ अशी भावना रोहिणी यांनी व्यक्त केली.