दखल- चिंतनशील लघुकथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अस्मिता प्रदीप येंडे

कथा हा साहित्यातला महत्त्वाचा प्रकार आहे. लघुकथा या मानवी जीवन आणि सामाजिक स्थिती यांची सांगड घालून मानवी मूल्यांना स्पष्ट करण्याचे काम करतात. असाच एक लघुकथा संग्रह म्हणजे लेखिका वीणा रारावीकर यांचा ‘गुजगोष्टी शतशब्दांच्या’

या लघुकथासंग्रहात शंभर शब्दांच्या मर्यादेत व्यापलेल्या शंभर कथांचा समावेश आहे. प्रत्येक कथेचे विषय, आशय विभिन्न आहेत. या लघुकथासंग्रहात मानवी जीवनातील विसंगती, भावनांचे विविध सूक्ष्म पदर, जगण्यातील आशा – निराशा, सकारात्मक जाणिवा, मानवी मनाच्या अवस्था तसेच प्रेरणादायी, परिवर्तनशील विचार, सामाजिक भावना, स्त्रियांचे भावस्पर्शी विश्व या सर्व घटकांना स्पर्श करणाऱया लघुकथा आहेत. मनातील भाव रिते करण्याची, व्यक्त होण्याच्या सहजसुंदर पद्धतीमुळे त्यांच्या मनातील तरल संवेदना कथेच्या रूपात अलगदपणे सामावल्या आहेत.

संग्रहातील ‘एक धक्का’ कथेतील निशाला इतरांसाठी करता करता स्वतचा मार्ग कसा गवसतो, याचे प्रेरक दर्शन घडते. परीक्षेत मिळालेल्या गुणांवर भवितव्य अवलंबून असते. अशा परिस्थितीत कौशल्य, विकास याकडे दुर्लक्ष करून फक्त गुण पाहून विद्यार्थ्यांची पात्रता ठरते. या तणावाखाली वावरणाऱया मुलांचे विश्व ‘युग स्पर्धेचे’ कथेत साकारले आहे. आयुष्य जगताना कधी कधी चौकटीबाहेर जाऊन निर्णय घ्यावे लागतात. ‘धाडस’ कथेतील श्रेया स्वतच्या कुटुंबासाठी, मुलीच्या भविष्यासाठी ठामपणे उभी राहते.

बदलत्या जीवनशैलीतील विभिन्न अंग दर्शवणाऱया तसेच सामाजिक भान जपत परिवर्तनशील समाज घडवू पाहणाऱया या लघुकथा भावविभोर करणाऱया आहेतच, पण वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱयासुद्धा आहेत. सृजनसंवाद प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘गुजगोष्टी शतशब्दांच्या’ लघुकथासंग्रहाचे मुखपृष्ठ व रेखाचित्रे अश्विनी खटावकर यांनी रेखाटली आहेत.आशयसंपन्न अशा या कथा वाचायलाच हव्यात.