
दैनिक ‘सामना’त प्रसिद्ध झालेला ‘फडणवीस, सांभाळा!’ हा अग्रलेख भाजप कार्यकर्त्यांना भलताच झोंबला. ठाण्यात खोपट येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज ‘सामना’विरोधात आंदोलन केले, पण ‘सामना’ पेटवण्याच्या नादात त्यांचे भान सुटले आणि त्यांनी ‘सामना’च्या मुखपृष्ठावर छापून आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोच जाळला. मुंबईतही भाजप कार्यकर्त्यांनी ‘सामना’ची जाळपोळ केली. भाजप कार्यकर्त्यांनी ‘सामना’ जाळला असला तरी ‘सामना’ कर्त्यांचा विचार मात्र कायमच आहे.
दैनिक ‘सामना’त आज ‘फडणवीस सांभाळा!’ हा अग्रलेख प्रसिद्ध झाला. या अग्रलेखाची राजकीय वर्तुळासह सर्वत्र जोरदार चर्चा झाली. कधीकाळी राज्याचे मुख्यमंत्री असणारे फडणवीस यांना हायकमांडच्या आदेशामुळे आज ‘उप’ व्हावे लागल्याचे सत्य दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडण्यात आले. हे सत्य भाजप प्रदेश अध्यक्षांपासून पदाधिकाऱयांच्या चांगलेच जिक्हारी लागले. ठाण्यात भाजपचे शहराध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले यांनी ‘सामना’विरोधात आंदोलन केले. अतिउत्साहाच्या नादात आपण काय करतो याचे भानही या भाजप कार्यकर्त्यांना राहिले नाही. त्यांनी मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा ठसठशीत फोटो छापलेला ‘सामना’चा अंक पेटवला. असे कृत्य करताना आपण आपल्याच नेत्याचा आणि पंतप्रधानांचा फोटो जाळत आहोत हे त्यांच्या लक्षातही आले नाही.
भाजप कार्यकर्त्यांनी ‘सामना’विरोधात मुंबईत भाजप प्रदेश कार्यालय, भायखळा, कांदिवली येथेही आंदोलन केले. यावेळी ‘सामना’च्या अंकाची जाळपोळ केली.



























































