‘Chandrayaan-3’चं पाऊल पडते पुढे! मॉड्यूलचं अंतिम डी-बूस्टिंग यशस्वी; उरले फक्त 25 किमी अंतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम चांद्रयान-3 शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागाच्या आणखी जवळ पोहोचले. विक्रम लँडर आता चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर दूर असून मॉड्यूलचे अंतिम डी-बूस्टिंगही यशस्वी झाले आहे. त्यामुळे हिंदुस्थान इतिहास रचण्याच्या आणखी जवळ पोहोचला असून चंद्रावर उतरण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी आहेत.

रविवारी मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान चांद्रयान-3च्या मॉड्यूलचे अंतिम डी-बूस्टिंग यशस्वी झाले. ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांना चांद्रयान-3चा वेगळ कमी करण्यात यश आले आहे. विक्रम लँडर आता चंद्राच्या सर्वात खालच्या कक्षेत पोहोचले असून चंद्रापासून त्याचे किमान अंतर फक्त 25 किलोमीटर तर कमाल अंतर 134 किलोमीटर आहे. आता सर्वजण 23 ऑगस्टची वाट पाहत आहेत. या दिवशी सूर्योदय होताच चांद्रयान-3 चंद्रावर उतरेल. सायंकाळी 5 वाजून 45 वाजता विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा अंदाज ‘इस्त्रो’ने व्यक्त केला आहे.

चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्योदयाची वाट पाहत आहे. सध्या चंद्रावर रात्र असून 23 ऑगस्ट रोजी येथे सूर्योदय होईल. विक्रम लँडर सूर्यप्रकाशाचा वापर करून आपले ध्येय साध्य करेल. लँडरचे रोव्हर वीज निर्मितीसाठी सौर पॅनेलचा वापर करेल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे लॉफ्ट लँडिग हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. असमतोल पृष्ठभाग, खड्डे आणि दगड-वाळू यामुळे चंद्रावर उतरणे धोकादायक आहे. लँडर चंद्राच्या पृष्ठभागाजवळ पोहोचताच मोठ्या प्रमाणत धूळ उडेल. त्यामुळे गोंधळ उडू शकतो. हे आव्हान पार केल्यानंतर लँडर चंद्रावर उतरेल. यासाठी इस्त्रोने लँडरचे पायही मजबूत केले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर चालणेही महत्त्वाचे असून ही मोहिम फत्ते झाल्यास रोव्हरकडून चंद्राच्या अनेक रहस्यांचा उलगडा होईल.