
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची आठ वर्षांनंतर रविवारी तुरुंगातून सुटका झाली. घोटाळ्याशी संबंधित आठ गुह्यांत याआधी जामीन मंजूर झाला होता. मात्र तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱयाला धमकी दिल्याच्या प्रलंबित गुह्यामुळे कदम यांचा तुरुंगात मुक्काम होता. त्या प्रकरणातही शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून कदम रविवारी ठाणे तुरुंगातून बाहेर आले.
कदम यांनी महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा गैरवापर करून तसेच बनावट कागदपत्रे बनवून अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोटय़वधींच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुरुवातीला 2015मध्ये दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापाठोपाठ इतर पाच जिह्यांत गुन्हे नोंद झाले. नंतर या गुह्यांचा तपास सीआयडीकडे वर्ग केला गेला. कदम यांना यंदा मार्चमध्ये मुख्य गुह्यात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांनी पाच जिह्यांतील गुह्यांत ऍड. प्रशांत राऊळ यांच्यामार्फत जामिनासाठी केलेले अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केले. तसेच आर्थर रोड तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱयाला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खटला शिवडी न्यायालयात सुरू होता. हा खटलाही विशेष पीएमएलए न्यायालयाकडे वर्ग झाला. या प्रकरणात जामिनासाठी ऍड. प्रकाश साळसिंगीकर यांनी युक्तिवाद केला. कदम यांच्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली होती. त्यांना या प्रकरणात अटकही केलेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर सरकारी पक्षाने आक्षेप घेतला. तथापि, दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश राहुल रोकडे यांनी 15 हजारांच्या जातमुचलक्यावर कदम यांना जामीन दिला. त्यानंतर रिलीज मेमोची प्रक्रिया पूर्ण केल्याने कदम यांची रविवारी सकाळी ठाणे तुरुंगातून सुटका झाली.



























































