
गरुडासन आणि पार्श्वनमन ही परस्परविरोधी विपरीत आसने, परंतु त्यांचे आपल्या शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम यांमध्ये फार साधर्म्य आहे. या आसनांविषयी आपण मागील दोन लेखांमध्ये माहिती घेतली.
हस्तपदांगुष्ठासन आणि नटराजासन ही परस्पर विरोधी विपरीत आसने आणि त्यांचे आपल्या शरीराच्या विभिन्न अवयवांवरती होणारे विपरीत किंवा विभिन्न परिणाम यांबद्दल थोडी माहिती घेऊ.
हस्त म्हणजे हात; पद म्हणजे पाय; अंगुष्ठ म्हणजे अंगठा; हस्तपदांगुष्ठासन या आसनामध्ये हाताने पायाचा अंगठा पकडून पाय सरळ समोर ताणला जातो आणि म्हणूनच या आसनाचे नाव आहे हस्तपदांगुष्ठासन.
आसनाचा विधी
प्रथम सरळ ताठ उभे राहावे. दोन्ही पाय जुळवून ठेवावे. नंतर डावा पाय गुडघ्यामध्ये दुमडून कमरेपर्यंत वर उचलावा. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडून पाय सरळ पुढे खेचण्याचा प्रयत्न करावा. हे करताना उजव्या हाताने कमरेला आधार द्यावा. यामुळे कमरेमध्ये लचक भरण्याची किंवा कंबरदुखी होण्याची शक्यता कमी होते. ज्यांना स्लिप डिस्क आहे किंवा कंबर दुखी आहे, त्यांनी मात्र या आसनाचा अभ्यास करू नये. आसनामध्ये 40 ते 50 क्षण स्थिर उभे राहावे. उजव्या पायावर शरीराचे संतुलन करण्याचा प्रयत्न करावा.
अशाप्रकारे हे आसन करून शरीराचे संतुलन करणे जमत नसेल तर हाताने पाय खेचण्याऐवजी आपला पाय कमरेच्या किंवा त्यापेक्षा जास्त उंचीच्या खुर्चीवर, मेजावर अथवा खिडकीच्या कठडद्यावर ठेवावा.
नंतर हेच आसन उजव्या बाजूने करावे. या आसनाची कमीत कमी दोन आवर्तने करावीत.
हस्तपदांगुष्ठासन आसन करण्यासाठी आपण ओढणी किंवा दोरी यांचाही वापर करू शकतो.
आपल्या कमरेच्या स्नायूंमध्ये आणि पायाच्या नसांमध्ये लवचिकता आली की पाय हळूहळू गुडघ्यात ताठ ठेवून आणखी वर उचलण्याचा प्रयत्न करावा. यामुळे पाय आणि कमरेची लवचिकता वाढत जाते.
हस्तपदांगुष्ठासन आसनाचे शरीराला अनेक फायदे आहेत. त्यामुळे याची कमीत कमी दोन आवर्तने करावी.
लाभ कोणते…
यामुळे आपल्या पायाच्या मागील बाजूच्या नसांना फार चांगल्या प्रकारे ताण मिळतो आणि त्यामुळे आपल्या पायाच्या गुडघ्यांमध्ये पायाच्या तळव्यांमध्ये पायाच्या बोटांपर्यंत रुधिराभिसरण चांगल्या प्रकारे होते. गुडघ्याचे स्नायू मजबूत होतात आणि त्यांची वेदना सहन करण्याची क्षमता वृद्धिंगत होते. शरीराच्या संतुलनाचाही चांगलाच अभ्यास होतो.
– सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in


























































