
‘पैचान कौन’ या पंचलाईनचा जनक, प्रसिद्ध कॉमेडियन आणि होस्ट नवीन प्रभाकर त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवीन सरप्राईज पॅकेज घेऊन आला आहे. ते सरप्राईज पॅकेज आहे, ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर’ हा नवा कोरा लाईव्ह शो. या लाईव्ह कार्यक्रमाचा आठवा खेळ बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात पार पडला. “कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर’ कॉमेडी शो च्या निमित्ताने नवीन प्रभाकर 15 वर्षांनी आपल्या खुमासदार शैलीमधे स्टँडअप कॉमेडीचे सादरीकरण करत आहे.
900 पेक्षा जास्त प्रेक्षकांची उपस्थिती असलेल्या त्या लाइव्ह शोने प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह हास्याच्या गडगडाटाने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. या लाईव्ह शोमध्ये नवीन प्रभाकर’सोबत नितीन भांडारकर आणि राजकुमार जावकर म्हणजेच राजकुमार रँचो याही स्टॅंडअप कॉमेडीयन्सनी प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करीत बुधवारच्या रात्रीची रंगत वाढविली. या शोची मूळ संकल्पना नवीन प्रभाकरची असून, प्रयास एंटरटेनमेंट चे प्रतीक मेहता यांचे सक्रिय निर्माता आणि स्वरूप स्टुडिओ यांचे क्रिएटिव्ह आणि कार्यकारी निर्माता म्हणून सहकार्य लाभलेले आहे.
कार्यक्रमाच्या स्वरुपाविषयी नवीन प्रभाकर सांगतो, “या कार्यक्रमाचे माध्यम हे पूर्णपणे हिंदी आहे. पण कार्यक्रमाला ज्या भाषिक माध्यमाचा प्रेक्षक लाभेल त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रमाचे सादरीकरण करतो. मराठी प्रेक्षक असेल तर अर्ध्या तासाचे मराठीतून सादरीकरण करतो. गुजराथी असेल तर आम्ही गुजरातीतूनच सादरीकरण करतो. या कार्यक्रमात व्यंगात्मक टिप्पणीही आहे. बॉलिवूड मिमिक्री, डान्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चालू घडामोडींवर विनोदी पद्धतीने भाष्यही केलेले आहे. त्यामुळे माझा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी फक्त हास्याची पर्वणी नसून ताणतणाव दूर करुन मनशांती देणारे अनोखे पॅकेज आहे.”

























































