तहसीलदारांना मारहाण; जीवे मारण्याचा प्रयत्न, नेवासा तालुक्यातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोजणी होईपर्यंत वहीवाटेचा रस्ता खुला करून देण्याचा प्रयत्न करणाऱया तहसीलदारांना धक्काबुक्की करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. तहसीलदार संजय बिरादार यांनी नेवासा पोलिसांत फिर्याद दिली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आह़े

करण घुले, सत्यजित घुले, ज्ञानेश्वर घुले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, कोतवाल, तलाठी, महसूल कर्मचारी, अधिकारी यांनी आरोपींना अटक होईपर्यंत ‘काम बंद’चा इशारा दिला आहे. तालुक्यातील धान्यदुकानदारांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

मुकीदपूर शिवाराच्या लेआउटमधील बंद करण्यात आलेला वहिवाटीचा रस्ता खुला करून द्यावा, याकरिता मुकीदपूर येथील नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदार संजय बिरादार हे तेथे पोहचून त्यांनी आंदोलकांची भेट घेत तक्रार निवारण करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार बिरादार हे आंदोलकांसोबत रस्त्याची पाहणी करण्यास गेले. त्यावेळी त्यांनी तलाठी अण्णा दिघे यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी सरपंच सतीश निपुंगे, पंढरीनाथ जाधव, बाळासाहेब ठोंबरे, संजय आगळे, बेबीताई गमे, आदेश साठे इतर नागरिक उपस्थित होत़े

पंचनामा पूर्ण झाल्यावर लेआऊटप्रमाणे रस्ता खुला होईपर्यंत चालू रस्ता गरजेचा आहे, असे सिद्ध झाले. पुढील मोजणी होईपर्यंत लेआऊटमधील अतिक्रमित रस्ता खुला करण्याच्या तोंडी सूचना कर्मचाऱयांना दिल्या. त्यावेळी करण घुले, सत्यजित घुले, ज्ञानेश्वर घुले यांनी हरकत घेत ‘आमच्या मालकीच्या जागेतून रस्ता कसा काय देणार’ असे म्हणत त्या तिघांनी तहसीलदार संजय बिरादार यांना धक्काबुक्की करीत जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी करीत तहसीलदारांना वाचविले. या घटनेनंतर बिरादार यांनी नेवासा पोलिसांत धाव घेत तिघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.