
हर्षवर्धन दातार << [email protected] >>
‘पलको कि छांव मे’ या चित्रपटातील ‘डाकिया डाक लाया’ या गाण्यातून एका खेडेगावातील पोस्टमनचे नेमके विश्व आपल्यासमोर उभे राहते. खरंतर हे गाणं तितकंस सोपं नाही,a पण किशोर कुमार यांनी हे गाणं अतिशय सहजपणे पेललं आहे. गुलजार यांचे सरळ सोपे आणि किंचितसे ‘गावरान’ शब्द, त्याला दिलेली चटपटीत चाल, किशोर कुमारची स्वच्छंद गायकी, पडद्यावरील अभिनय, गावकऱयांचे साजेसे हाव-भाव आणि सुंदर चित्रीकरण यांचा मिलाफ म्हणजे हे आयकॉनिक गाणे.
आजच्या गाण्याविषयी विचार करताना पु. ल. देशपांडेंच्या ‘पौष्टिक जीवन’ या लेखाची प्रकर्षाने आठवण झाली. त्यातील काही बोलक्या ओळी आजच्या लेखाची जणू प्रस्तावनाच करतात. “वाजवायच्या पेटीसारखे पोस्टांच्या पेटीत पडलेल्या पत्रांचे सूर उमटवण्याची जादू असती तर रोजच्या डिलिव्हरीला सुख, दुःख, राग, लोभ, मत्सर, ममता, समाधान अशा सुप्त सुरांचा आणि भावनांचा कोलाहल आणि त्यातून, ‘विजू, मी तुझ्यासाठी झुरतोय’, ‘इकडील सर्वांचे क्षेम’, ‘काल रात्री देवाज्ञा झाली. असले विविध मजकूर ऐकायला आले असते. आपल्या घरी पोस्टमन यावा असे प्रत्येकाला वाटते. पोस्टमन आणि पाऊस हे हवे तेव्हा येत नाहीत.” या लेखातून पुलंनी संपूर्ण टपाल खाते आणि त्यातील व्यवहार आपल्यासमोर जिवंत उभे केले. लेखक आणि गीतकार शब्दांचे जादूगार वर्डस्मिथ गुलजारनी ‘पलको कि छांव मे’ या चित्रपटातील ‘डाकिया डाक लाया’ या काही मिनिटांच्या गाण्यातून एका खेडेगावातील पोस्टमनचे नेमके हेच विश्व आपल्यासमोर उभे केले. त्यांची प्रेरणा, प्रख्यात संगीत दिग्दर्शक सलील चौधरी यांचे ‘रनर’ हे हेमंत कुमारनी गायलेले मूळ बंगाली गाणे. त्यांच्या बोलक्या आणि रंजक शब्दांना तशीच समर्पक अशी खेळकर आणि उडती चाल दिली संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. किशोर कुमार आणि वंदना शास्त्राrंनी गायलेले हे गाणे खूप लोकप्रिय झाले आणि आजही अनेकांच्या आठवणीत आहे. एका खेडेगावात पत्र, तारा, मनीऑर्डरचा बटवडा करणाऱया पोस्टमन रवी सिन्हा (राजेश खन्ना) याच्या आयुष्यातील एक दिवस या गीतातून साकारला आहे. गाण्याचे चित्रीकरण अतिशय विलोभनीय आहे. गावातील लोकांच्या चेहऱयावरचे वेगवेगळे भाव, आनंद, दुःख, आतुरता, खिन्नता हे कल्पकतेने टिपले आहेत. गाण्याची सुरुवात सायकल घंटीच्या किणकिणाटाने होते आणि पोस्टमनची हाळी ऐकू येते.
डाकिया डाक लाया ख़ुशी का पयाम कही,
कही दर्दनाक लाया… डाकिया डाक लाया…
आला रे आला डाकिया आला, (‘डाकिया’ हे पोस्टमनचे हिंदीतील सर्वनाम) सुखदुःखाच्या वार्ता घेऊन आला. पोस्टमननी आणलेल्या पत्रात असंख्य भाव दडलेले असतात. एकीकडे नवीन जन्म झालेल्या सुवार्ता तर दुसरीकडे मृत्यूवार्ता. यही है जिंदगी, कभी धूप तो कभी छांव. पोस्टमन मात्र एखाद्या स्थितप्रज्ञासारखे निष्कर्म काम करीत राहतो.
इन्दर के भतीजे की साली की सगाई है,
आती पूरनमासी को क़रार पाई है..
मामा आप को लेने आते, मगर मजबूरी है..
बच्चों समेत आना, आप का जरुरी है
दादा तो…अरे रे रे रे… दादा तो गुजर गए!
दादी बीमार है.. नाना का भी तेरहवां आते सोमवार है..
छोटे को प्यार देना! बड़ों को नमस्कार!
मेरी मजबूरी समझो, कारड को तार!
वरील सलग ओळीत ‘डाकिया’ गावातील महिलेला आणि तिच्या मुलांना एक सविस्तर पत्र वाचून दाखवत आहे. थोडक्यात आशय असा की, इंदरच्या भाचीच्या मेहुणीचा साखरपुडा आहे. मामा आले असते घ्यायला, पण ते शक्य नाही. तरी या कार्पामाला सर्वांनी आवर्जून यायचे. आजोबांना देवाज्ञा झाली आहे. आजीही आजारी आहे. थोरांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद. हे कार्ड तार समजून योग्य ते ठरवावे.
बिरहा में कैसे काटू रतियां सावन सुनाये बैरी भीगी भीगी बतिया
अग्नि की जलन में जले बावरिया नौकरियाँ छोड़ के
तू आ जाना सांवरिया आजा रे सांवरिया आजा बैसाख आया
गावातील एक तरुणी (विशेष भूमिकेत अरुणा इराणी) आणि आपले डाकिया बाबू या उभयतांत गद्य -पद्य रूपात वरील संवाद होतो.
तरुणी : ए डाकिया बाबू
डाकिया : काय गं?
तरुणी : सहा महिने झाले ‘इकडून’ काही समाचार नाही.
डाकिया : अरे हो का? बोल त्यांना पत्रात काय लिहू?
तरुणी : इश्श, काही नाही, फक्त लवकर येणे करावे इतकंच!
पोस्टमन पत्रात जे सांगायचं प्रयत्न करतो त्याचा थोडक्यात आशय असा की विरहात आता एकटेपणामुळे दिवस आणि रात्री सरता सरत नाहीत, त्यात श्रावणसरींमुळे हा विरह वैशाख वणव्यासारखा आणखीन जाचक होतो आहे. नोकरी सोड, सुट्टी घे. कसंही आणि काहीही कर, पण जिवलगा आता लवकरात लवकर ये रे प्रिया!
ए मुनिया, होली के होली मनिया घर से माल भेजे है
डाल के लिफाफे में, सैंया गुलाल भेजे है
किसी की दिवाली आई, किसी का दिवाला
एकूण गाण्याच्या लांबीमुळे वरील तिसरे कडवे हे रेडिओवर लागत नसे. पण चित्रपटात आहे. संपूर्ण गाण्यात ‘डाकिया’ आपले काम करीत असताना गावातल्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. पत्र वाचणे आणि पत्र लिहिण्याचे कामही करतो. सलग, पण वर-खाली तालात ठेक्यात येणारे शब्द असल्यामुळे हे गाणं तितकेसे सोपे नाही. पण हरफनमौला किशोर कुमारला काय साध्य नाही! त्यांनी हे गाणे अतिशय सहजपणे पेलले आहे. संगीत संयोजनात व्हायोलिन, सरोद, करुण क्षणांना साजेशी तार शहनाई (किंवा रावणहत्ता असावा) आणि गावातील वातावरण असल्यामुळे ‘एलपी विशेष’ ड्रम्स, ढोलक, डफचा सुंदर उपयोग केला आहे. वेगवेगळ्या भावनांच्या अभिव्यक्तीकरिता एलपीनी संगीतातदेखील साजेसे उतार चढाव बेतलेले आहेत. गुलजार यांचे सरळ सोपे आणि किंचितसे ‘गावरान’ शब्द, त्याला दिलेली चटपटीत चाल, किशोर कुमारची स्वच्छंद गायकी, पडद्यावरील अभिनय, गावकऱयांचे साजेसे हावभाव आणि सुंदर चित्रीकरण यांचा मिलाफ म्हणजेच हे आयकॉनिक गाणे.
पूर्वीच्या काळी आपल्या जिवलगांचे, मित्रांचे, नातेवाईकाचे संदेश ने-आण करणाऱया ज्या व्यक्तीची लोक चातकासारखी वाट बघत तो म्हणजे पोस्टमन अर्थात डाकिया. बारा महिने थंडी, वारा, ऊन, पावसाची तमा न बाळगता अखंड आणि अविरत काम करणाऱया पोस्टखात्यावर आपलं आयुष्य निर्भर होते. आता मात्र कुरियर आणि आंतरजालच्या युगात हे पोस्ट खाते हळूहळू इतिहासजमा होऊ लागले आहे. तरीही हे गाणे आपल्याला त्या पूर्वीच्या पौष्टिक जीवनाची आठवण करून देते. ‘डाकिया डाक लाया’ आणि मूळ बंगाली गाणे ‘रनर’ ही दोन्ही गाणी यूटय़ूबवर उपलब्ध आहेत.
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)




























































