पश्चिम महाराष्ट्रात तीव्र पडसाद; रास्ता रोको!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्याचे तीक्र पडसाद आज पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नगरमध्ये उमटले. या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, घोषणाबाजी, रास्ता रोको करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पोस्टर्सना जोडे मारण्यात आले. यावेळी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. दरम्यान, उद्या (दि. 3) सोलापूर जिल्ह्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.

नगरमध्ये सरकारविरोधात निदर्शने
जालना येथे मराठा समाजावर बेछूटपणे लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मिंधे सरकारच्या विरोधातील घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभापती गणेश कवडे, सुरेखा कदम, संजय शेंडगे, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, विजय पठारे, दीपक खेरे, संतोष गेनपा, शिवाजी कदम, आशा निंबाळकर, गौरव ढोणे, श्रीकांत चेमटे, संदीप दातरंगे, प्रताप गडाख, अनिकेत गवळी, अरुण झेंडे, मुना भिंगारदिवे, सुनील सुडके आदी उपस्थित होते.

दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी चंद्रकांत गाडे, गणेश भोसले, अविनाश घुले, प्रा. माणिक विधाते, संपत बारस्कर, विनित पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, अभिजित खोसे, निखिल वारे, खासेराव शितोळे आदी उपस्थित होते.

नगरमध्ये संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे यांनी आज नगर येथे पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेऊन जिह्यातील आंदोलनाचे नियोजन करणार असल्याचे सांगितले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देणार असल्याचे सांगितले. तर मराठा महासंघाने जिह्यातील अकोले, कर्जत व जामखेड येथे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले.

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, अण्णासाहेब सावंत, रमेश आजबे, दत्तात्रय वारे, मंगेश आजबे, राहुल उगले, कुंडल राळेभात, पवन राळेभात उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब थोरात प्रतिक्रिया देताना म्हणाले, जालना जिह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकरवी झालेला लाठीचार्ज हा सरकारपुरस्कृत भ्याड हल्ला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही निदर्शने
जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या घटनेचे संतप्त पडसाद कोल्हापूर जिह्यात दुसऱया दिवशीही उमटले. काल लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारविरोधात तीक्र निदर्शने करण्यात आली होती. आज जिल्ह्यात ठिकठिकाणी राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. आज सायंकाळी श्री मारुती मंदिरात मशाल पेटवून हिशेब चुकता करण्याचा निर्धार करण्यात आला.

राधानगरी येथे आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा तालुका काँग्रेसच्या वतीने असळज बाजारपेठ येथे निषेधसभा घेण्यात आली. यावेळी बजरंग पाटील, एस. के. पाटील, संभाजी पाटणकर, चंद्रकांत खानविलकर, सहदेव कांबळे, उदय देसाई आदी उपस्थित होते.

हुपरी येथील बस स्थानक चौकात मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून मिंधे सरकारविरोधात घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अमोल देशपांडे, विनायक विभूते, पृथ्वीराज गायकवाड, रविशंकर चिटणीस, प्रतापसिंह देसाई सहभागी झाले होते.

महाराष्ट्राची माफी मागूनच अजित पवारांनी कोल्हापुरात यावे!

– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 10 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन देऊन ते न पाळणाऱया अजित पवारांनी कोल्हापुरात येऊ नये. त्यांना यायचे असेल, तर महाराष्ट्राची माफी मागूनच कोल्हापुरात यावे आणि या घटनेचे उत्तरदायित्व घ्यावे; अन्यथा त्यांच्या सभेत हिशेब चुकता केला जाईल, असा इशारा अॅड. प्रवीण इंदुलकर यांनी दिला आहे.

मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींवर नाराजी

– ‘सकल मराठा समाजाच्या जीवावर लोकसभा, राज्यसभा, विधानसभेत अनेक लोकप्रतिनिधी प्रतिनिधित्व करीत आहेत. मराठा समाजावर इतका अन्याय होऊनही एकही लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाही, ही शोकांतिका आहे,’ अशी भावना समन्वयक दिलीप देसाई यांनी व्यक्त केली.

सोलापुरात ‘जोडे मारो’ आंदोलन, महामार्ग रोखला
जिल्ह्यात आज ठिकठिकाणी लाठीहल्ल्याचा निषेध करीत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. संभाजी ब्रिगेडने पुणे महामार्ग रोखून धरला, तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई न झाल्यास ‘सोलापूर बंद’चा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर शहरासह बार्शी, मोहोळ, करमाळा तालुक्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून पुतळा जाळण्यात आला.

सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारत लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात तीक्र घोषणाबाजी करण्यात आली. मोहोळ येथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करीत त्यांचा पुतळा जाळण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी येथे दुपारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

करमाळ्यात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, 6 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. केममध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स जाळण्यात आले. बार्शीतील पांडे चौकात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करीत रास्ता रोको करण्यात आले. यावेळी गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

माढय़ात कडकडीत बंद
माढय़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. शंभूराजे साठे यांनी बंदचे आवाहन केले होते. दरम्यान, माढय़ातील मुख्य चौकामध्ये मराठा समाजाच्या वतीने टायर पेटवून सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी आमदार बबन शिंदे, शंभूराजे साठे, दिनेश जगदाळे, दत्ता शिंदे यांची भाषणे झाली.

फडणवीसांनी राजीनामा द्यावा – रावसाहेब खेवरे
मराठा बांधवांवर अमानुषपणे लाठीमार करणारी घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून, या घटनेची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी संतप्त मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केली. या मागणीचे निवेदन राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तसेच महसूल प्रशासनास देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख सचिन म्हसे, बाबासाहेब मुसमाडे, डॉ. संजय म्हसे, संतोष येवले, बाळासाहेब गाडे, संदीप आढाव, कैलास कोहकडे, विजय शिरसाठ, सुनील शेलार, कैलास आडसुरे, पोपट शिरसाठ, रोहन भुजाडींसह शिवसैनिक उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात असंतोषाचा भडका; निदर्शने, रास्ता रोको

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे सातारा जिल्ह्यातही असंतोषाचा भडका उडाला. या घटनेचा निषेध करीत सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज तीक्र आंदोलने छेडण्यात आली. यावेळी ‘मिंधे सरकार’विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सातारा येथील पोवई नाक्यावर सकाळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विवेकानंद बाबर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी शरद काटकर, बापू क्षीरसागर यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कराडमध्ये मराठा मोर्चाचे संघटक अनिल घराळ यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ करण्यात आला.

पाटण येथील लायब्ररी चौकात मराठा क्रांती मोर्चाचे पाटण तालुका संघटक यशवंत जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर, संजय इंगवले, रामभाऊ पवार, दीपक पाटणकर सहभागी झाले होते.फलटणमधील डेक्कन चौकात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माउली सावंत यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करण्यात आला.

ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, अभिजित बेडके यांची भाषणे झाली.
माण तालुक्यात दहिवडी येथे दुपारी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बालाजी जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली गेली. सोमवारी (4 रोजी) ‘खटाव बंद’ची हाक देण्यात आली.