
सकाळपासून मुंबई शहरासह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेला फटका बसला. दृश्यमानता घटल्याने गाडय़ा मर्यादित वेगाने धावत होत्या. त्यामुळे सकाळी साडेनऊच्या ठोक्याला कार्यालयात हजेरी लावणाऱ्या अनेकांना आज लेटमार्क लागला. तसेच उशिराने धावणाऱ्या गाडय़ांमुळे सर्वच स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. त्यामुळे लोकल पकडताना प्रवाशांची मोठी दमछाक झाली.
मुंबई शहरासह उपनगरात आणि कर्जत, कसारा घाट परिसरात पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने त्याचा परिणाम पहाटेपासूनच मुंबईत दाखल होणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेगावर झाला. परिणामी उपनगरीय लोकल सकाळपासूनच पंधरा-वीस मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने लोकलचा वेग आणखी मंदावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दुपारपर्यंत लोकल सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या.
प्रवाशांकडून नाराजी
मध्य रेल्वे मार्गावर कधी सिग्नलमधील बिघाडामुळे तर कधी मालवाहतुकीच्या गाडीमुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत होऊन त्याचा मनःस्ताप प्रवाशांना होतो. मात्र आज कोणताही तांत्रिक बिघाड नसताना केवळ पावसामुळे लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांकडून मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. मध्य रेल्वे कधीच प्रवाशांचा विचार करत नाही. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने गाडय़ा उशिराने धावत असून त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे उपनगरीय प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.























































