
पुण्याचे पालकमंत्री कोण? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार की उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील? अशा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या असतानाच शनिवारी त्याचा पुढचा अध्याय पाहायला मिळाला. एका कार्यक्रमासाठी या दोघांनाही निमंत्रण होते. मात्र, चंद्रकांत पाटील हे पोहोचण्यापूर्वीच अजित पवार यांनी कार्यक्रम सुरू केल्याने पुन्हा एकदा कुरघोडीचे राजकारण घडल्याच्या चर्चा होत आहेत. यातच उशिरा आलेले चंद्रकांत पाटील स्टेजवर असताना अजित पवार यांनी ‘लवकर वेळेवर उठायला शिका. कार्यक्रमास वेळेत जायला शिका,’ असा टोला त्यांनी लगावला. मात्र, तो कोणासाठी होता, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुणे जिल्हा परिषदेतर्फे ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ व ‘अध्यक्ष चषक पुरस्कार’ वितरण आणि शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, ‘वेळेत उठायला शिका, चांगल्या सवयी लावा, कामाला लवकर सुरुवात करा, कार्यक्रमास वेळेत पोहोचा. उगीच ढेरी सुटलीय असे नको. हा सल्ला माझ्यासह सगळ्यांना आहे.’ मात्र, या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील उशिरा पोहोचल्याने त्यांना अजित पवार यांनी टोला लगावल्याचे बोलले जात आहे.
चंद्रकांत पाटील म्हणताहेत, ‘मम’!
‘ओरखडा येऊ न देता चिमटा काढायचा, असा अजित पवार यांचा स्वभाव आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सूचनेचे पालन करावे. अजितदादांना जे भाषणातून सांगायचे होते, तेच मलाही सांगायचे आहे. मी अजित पवार यांच्या भाषणाला ‘मम’ म्हणतो,’ असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजितदादांच्या वक्तव्याला उत्तर दिले.





























































