
अहमदाबादेत होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची तिकिटे काही क्षणात सोल्डआऊट होत असल्याचे चित्र समोर असताना कोलंबोतील याच कट्टर प्रतिस्पर्धांमधील सामन्याला चक्क प्रेक्षकच गायब होते. अहमदाबादला ब्लॉकबस्टर असलेला सामना कोलंबोत अक्षरशः फ्लॉपबस्टर झालाय. चक्क दीडशे रुपये तिकीट असूनही स्टेडियम रिकामे असल्याचे दुर्दैवी दृश्य पाहावे लागले. हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला आजवर इतकी अत्यल्प उपस्थिती कधीच लाभली नव्हती. त्यामुळे एकीकडे कुणी तिकीट देता का तिकीट अशी विनवणी करणारे चाहते आहेत तर दुसरीकडे कुणी तिकीट घेता का तिकीट, अशी विनंती करणारे श्रीलंकन दिसले.
रविवारी हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामना पूर्ण व्हावा म्हणून पीसीबीने एक दिवस राखीव ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर प्रेक्षकांची गर्दी व्हावी म्हणून तिकिटांचे दरही कमी करण्यात आले. तिकिटांचे दर 1000 आणि 500 श्रीलंकन रुपये (म्हणजे 260 आणि 130 हिंदुस्थानी रुपये) इतके कमी करण्यात आले. पण पावसाच्या भीतीने प्रेक्षक मैदानापर्यंत पोहोचलेच नाहीत. प्रेक्षकांच्या अत्यल्प उपस्थितीबाबत श्रीलंकन क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱयांना विचारले असता त्यांनी पावसाचे कारण सांगत हात वर केले. तसेच स्थानिक नागरिकांना हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याबाबत फार उत्सुकता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
असे पहिल्यांदाच घडले…
हिंदुस्थानचा सामना जगाच्या कोपऱयात कुठेही असला की क्रिकेटप्रेमी हाऊसफुल्ल गर्दी करतातच. 2012 साली श्रीलंकेतच टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हाही हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात सामना होता आणि या सामन्यात प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरले होते. त्यानंतर मिरपूर, मेलबर्न, पर्थ, दुबई, बर्मिंगहॅम, लंडन आणि मँचेस्टर येथे हिंदुस्थान-पाकिस्तानच्या लढती झाल्या आणि सर्वच्या सर्व अभूतपूर्व गर्दी झाल्या होत्या. पण कोलंबोतील रिकाम्या खुर्च्या पाहून साऱयांचाच अपेक्षाभंग झाला आहे. श्रीलंकेला या सामन्याकडून खूप अपेक्षा होत्या. कारण या स्पर्धेतून त्यांना कोणताही आर्थिक फायदा होणार नसल्यामुळे तिकीट विक्रीतूनच उत्पन्नाची अपेक्षा होती, पण श्रीलंकेचा अपेक्षाभंग झाला.
























































