रेल्वे स्थानकात येणार क्लीन-अप मार्शल राज! पिचकारी बहाद्दरांवर, घाण करणाऱ्यांवर होणार कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे स्थानकाच्या भिंती, लोकल ट्रेनचे दरवाजे-खिडक्या रंगवणाऱया पिचकारी बहाद्दरांची आता खैर नाही. रेल्वे स्थानकात थुंकणाऱयांवर, घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी रेल्वेने मध्य रेल्वेने क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात लोकमान्य टिळक टर्मिनस येथून केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच स्थानकांमध्ये क्लीन-अप मार्शल दिसणार आहेत.

मध्य रेल्वेकडून स्थानकांच्या आणि लोकल ट्रेनसह लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या स्वच्छतेवर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. तरीही अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसते. त्या पार्श्वभूमीवर स्थानकांमध्ये घाण करणाऱयांवर कारवाई करत दंड वसूल करण्यासाठी खासगी एजन्सीच्या माध्यमातून क्लीन अप मार्शलची नियुक्ती करण्यासाठी रेल्वने निविदा मागवल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये सुरुवातीला हे क्लीन अप मार्शल तैनात केले जाणार आहेत. सदरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबई विभागातील इतरही स्थानकांमध्ये अशा मार्शलची नियुक्ती करण्याचे नियोजन असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

प्रवाशांची लूट होण्याची भीती

मुंबई महानगरपालिकेने पिचकारी बहाद्दरांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक वॉर्डांमध्ये क्लीन-अप मार्शलच्या नियुक्त्या केल्या होत्या, मात्र संबंधित मार्शल नागरिकांकडून अवाच्या सवा दंड वसूल करून त्यांची लूट केली जात होती. अनेकदा दंड वसुलीसाठी दमदाटी, जबरदस्ती केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने ही योजना बंद केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेनने दररोज हजारो नागरिक येतात. त्यामुळे त्यांची क्लीन-अप मार्शलकडून लूट होण्याची शक्यता भीती प्रवासी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.