यंगिस्तान – सफर गोरखगडची!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

सातवाहन काळात केवळ छन्नी, हातोडय़ांनी उभ्या कातळकडय़ास भिडून कारागिरांनी निर्माण केलेले गोरखगडासारखे हे रांगड पाषाणशिल्प पाहून आपण थक्क होऊन जातो.

ठाणे जिह्यातील मुरबाड तालुक्यात गोरखगड आहे. पुणे जिह्यातील जुन्नर ते आंबेगाव पट्टय़ात माळशेज घाट, नाणेघाट, दाऱयाघाट, आहुपे घाटसारख्या प्राचीन घाटवाटा आहेत. आजमितीस यातील माळशेज घाट वगळता इतर तिन्ही घाटांतून पायीच उतरावे लागते. भीमाशंकर रांगेतील आहुपे घाट ही अशीच पायी उतरण्यासाठीची दुर्गम घाटवाट आहे. घाटमाथ्यावरील आहुपे, तर घाटाखालील खोपिवली या छोटय़ा गावांना जोडणारी ही घाटवाट आजही वापरात आहे. शेकडो वर्षांपूर्वी या घाटाचे रक्षण करण्यासाठी दुर्गविशारदाने या घाटमार्गालगत असलेल्या जुळय़ा सुळक्यांपैकी एकावर एक किल्ला बांधून काढला. हा किल्ला म्हणजे किल्ले गोरखगड होय.

किल्ले गोरखगड जरी आहुपे घाटाजवळ असला तरी गोरखगडाला भेट देण्यासाठी आपणास थेट माळशेज घाट गाठावा लागतो. पुढे माळशेज घाट उतरून धसई-महाज ते गडपायथ्याचे खोपिवली गाव असा दूरवर प्रवास करत आपण गोरखगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. गोरखगडाच्या बाजूला असलेला सुळका मच्छिंद्रगड म्हणून ओळखला जातो, पण त्यावर कोणतेही दुर्गावशेष नाहीत. गोरखगडाचा सुळका त्याच्या पोटातील कातळकोरीव गुहांमुळे दूरूनच उठून दिसतो. मळलेल्या पायवाटेने साधारण तासाभरात दोन्ही सुळके उजवीकडे ठेवत आपण गडपायथ्याच्या सपाटीवर येऊन पोहोचतो. या ठिकाणी गोरक्षनाथांचे मंदिर व आश्रम आहे.

गडाचे आकर्षक असलेली गुहा
गडाला चोहोबाजूंनी तुटलेले कडे आहेत. जिथे शक्य असेल तिथे दुर्गविशारदाने पायऱया खोदलेल्या आहेत. या पायऱया काळजीपूर्वक चढत आपण गोरखगडाच्या कातळकोरीव प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. पुढे भुयारी मार्ग पार करत आपण गडप्रवेश करतो. समोरच एक छोटी गुहा दिसून येते. पुढे गडमाथ्यावर पायऱयांच्या वाटेने जाताना एका पायरीवर शिलालेख कोरलेला दिसून येतो. या देवनागरी शिलालेखात नाथपंथीय साधूंचा उल्लेख आहे. पुढे डावीकडे एका गुहेमध्ये घोडय़ावर स्वार असणाऱया वीराचे शिल्प कोरलेले आहे. त्याच्या शेजारी कावड घेतलेला सेवक आहे. पुढे आपण गडाचे मुख्य आकर्षण असलेल्या गुहेत येऊन पोहोचतो. ही गुहा अतिशय प्रशस्त असून ती सहा खांबांवर तोललेली आहे. गुहेतून समोरील मच्छिंद्रगडाचे खूप सुंदर दर्शन होते.

कातळकोरीव पायऱया
गुहेसमोरील टाक्यांच्या जवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठीची वाट आहे. त्यासाठी सुरुवातीचा दहा ते पंधरा फुटांचा रॉक पॅच आपण काळजीपूर्वक पार करायचा. पुढे कातळकोरीव पायऱयांचा मार्ग सुरू होतो. या पायऱया उंचीवर असल्याने तोल सांभाळण्यासाठी या पायऱयांमध्ये खोबण्या केलेल्या आहेत. या पायऱया चढून आपण गडमाथ्यावर येतो. गडमाथा अत्यंत आटोपशीर आहे. त्यावर गोरक्षनाथाचे एक छोटेखानी मंदिर वगळता इतर कोणतेही दुर्गावशेष नाहीत, पण गडमाथ्यावरून समोरच्या सिद्धगडाचे, आहुपे घाटाच्या तुटलेल्या कडय़ांचे, दूरवरील नाणेघाटाचे जे राकट दर्शन घडते ते विलक्षण आनंदाची अनुभूती देते. गोरखगडाची निर्मिती सातवाहन काळातील असावी. या गडाचा उपयोग मुख्यत्वे टेहळणीसाठी केला जायचा. या पहाडाला दुर्ग रूप देणारे सातवाहन इथले. हा सह्याद्रीचा कातळ इथलाच. हा गड राखणारे लोकही इथलेच. ही भावना मनाला विलक्षण आनंद देणारी आहे.