
दसर्यानिमित्त आणि घटस्थापनेनिमित्त घरातील कपडे आणि इतर वस्तुंची धुणे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या तीन बालकांचा खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना केज तालुक्यात घडली आहे. या तीन बालकांमध्ये दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे.
दसरा आणि घटस्थापनेनिमित्त काढण्यात आलेल्या दसर्याचे धुणे धुण्यासाठी आईसोबत खदाणीवर गेलेल्या कुटुंबावर काळाने झडप घातली. सदर महिला कपडे धुत असताना पाच बालके खदाणीच्या पाण्यात उतरली होती. त्याच वेळी अचानक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. मुलं बुडायला लागल्यानंतर सदर महिलेने आरडाओरड करून लोकांना जमा केले. जमा झालेल्या लोकांनी त्यातील दोघांना वाचवले मात्र दोन मुले आणि एका मुलीचा बुडून मृत्यू झाला.
मृतांमध्ये घोडके कुटुंबातील दोन बालके संतोष घोडके, यश घोडके यांचा समावेश आहे तर वैष्णवी वैरागे यांचा मृत्यू झाला. बीड रोडवर असलेल्या वडार वस्ती भागातील खदाणीत घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले.




























































