
>> अनघा सावंत
आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी, सर्वांगीण विकासासाठी झटणाऱया वर्षा फातरपेकर यांची ओळख…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा वसा घेऊन आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली 19 वर्षे कार्य करणारी तेजस्विनी म्हणजे वर्षा विजय फातरपेकर. पालघर जिह्यातील मासवण येथील ‘आदिवासी सहज शिक्षण परिवार’च्या ‘कन्या छात्रालय, मासवण’ या संस्थेची कार्यकर्ती, सचिव ते कार्यकारी अधिकारी या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अविरतपणे चालू आहे. तसेच 2019 ते 2022 या काळात पालघर जिह्यातील ‘बाल कल्याण समिती’च्या सदस्य म्हणूनही त्या कार्यरत होत्या.
बीए (अर्थशास्त्र), एमए (सामाजिक शास्त्र) तसेच टाटा इन्स्टिटय़ूटमधून सामाजिक कार्याचे शिक्षण घेऊन त्यांनी पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता स्वतŠचा वाट निवडत मुंबईमध्ये दादर, शिवडी या विभागातील ‘महिला दक्षता समिती’ या संस्थेच्या कौटुंबिक सल्ला केंद्रात समुपदेशक म्हणून त्यांनी काम पाहिले. पतीची कामानिमित्त गुजरातला बदली झाल्यानंतर तिथे ‘कल्याणी महिला गृह उद्योग’ या संस्थेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या तळागाळातील महिला बालवाडी, अंगणवाडी चालवण्याबरोबरच ज्यूट, बांधनी या कपडय़ाचा वापर करून बॅगा, ऍप्रन तसेच फाईली बनविण्याचा उद्योग करीत. या उद्योगाचा विकास कसा होईल, महिलांचे उत्पन्न कसे वाढेल यादृष्टीने वेगवेगळे प्रयोग केले. याचे यश म्हणजे जपानमधूनही या महिलांच्या उत्पादनाला मोठी मागणी आली. पुन्हा महाराष्ट्रात आल्यानंतर 2004 मध्ये ‘आदिवासी सहज शिक्षण परिवार’ या संस्थेश त्या जोडल्या गेल्या. याविषयी त्या म्हणाल्या, ‘‘1978 साली अनुताई लिमये यांनी पालघरमधील मासवण येथे ‘आदिवासी सहज शिक्षण परिवार’ ही संस्था उभी केली. आजूबाजूच्या 40 गावांपैकी पाचवी ते दहावीपर्यंतची मध्यवर्ती शाळा ही फक्त मासवणमध्येच असल्याने मुलींना शाळेत पाठवले जावे, त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याच हेतूने वसतिगृह हा उपक्रम संस्थेने सुरू केला आहे.’’
जगप्रसिद्ध असलेल्या आदिवासींच्या या कलेला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केला. तसेच गेली 14 वर्षे वसतिगृहाचा शैक्षणिक निकालही शंभर टक्के लागत आहे. लॉकडाऊनच्या बिकट काळात शाळा बंद असताना वर्षा यांनी गावातील सरपंच आणि पालक यांच्याशी चर्चा करून पहिली ते चौथीच्या मुलांसाठी पाडय़ात खेळघरे सुरू केली. मुलांच्या कलागुणांना वाव देत ते शिकत असलेल्या शिक्षणात मदत करणे अशी या खेळघरांची संकल्पना आहे. आता एकूण 15 खेळघरे चालू आहेत. याच पाडय़ातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारे ताई, दादा स्वतः शिकता शिकता ही खेळघरेही घेतात. मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी 17 जिल्हापरिषद शाळांसोबत आमचा पुस्तक गाडी उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांत सहकारी व मदत विश्वस्त यांचेही योगदान आहे, असे वर्षा यांनी सांगितले.
1994 साली राष्ट्र सेवा दल, पुणे तसेच 2010 साली शालिनीताई गोठककर आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई यांचा उत्कृष्ट कार्यकर्ती हा पुरस्कार, 2013 साली पुन्हा एकदा रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्याकडून उत्कृष्ट कार्यकर्ती म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या आणि वर्षा यांच्या कार्याला सलाम!




























































