
‘पक्षातून बाहेर गेलेल्या काही लोकांनी आपल्याला सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. आपल्या पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे आपल्यासमोर संघर्षाची वेळ आली आहे. पण आपण लढू आणि जिंकूच’, असा वज्रनिर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेला माहीत आहे असेही ते म्हणाले.
मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा आज आयोजित केला होता. त्या बैठकीला शरद पवार यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीला जबाबदार असलेल्या भाजपवरही निशाणा साधला. ‘राज्यातील आपले सरकार गेले पण देशभरात जे लोक भाजपसोबत गेले आहेत त्यांच्यासोबत जनता नाही आणि इतर कुणीही त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक नाहीत हे लक्षात घ्या’, असे शरद पवार म्हणाले.
भाजपला सत्तेतून खाली खेचायचंय
देशातील अनेक राज्यांमध्ये आज भाजपची सत्ता नसून देशात भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे असे नमूद करत दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगालसह कोणत्या राज्यात भाजपा आहे? असा प्रश्नही शरद पवार यांनी उपस्थित केला. भाजपा देशात दिवसेंदिवस कमी होतेय हे सिद्ध झाले आहे. भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असून कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेतून खाली खेचायचंच असा वज्रनिर्धार त्यांनी केला.

























































