सोलापुरात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; एमडी बनवून विकणाऱ्या भावांना दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाका पोलिसांनी नाशिकमध्ये एमडी बनविणाऱ्या एका फॅक्टरीवर धडक कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच मुंबई गुन्हे शाखेने सोलापुरात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई केली. तेथील एमआयडीसी परिसरात केमिकल कंपनीच्या नावे फॅक्टरी थाटून केमिकल लोच्चा करत एमडी बनविणाऱ्या दोघा भावांना दया नायक व त्यांच्या पथकाने दणका दिला. त्यांच्याकडून आठ किलो एमडी व 60 किलो एमडी बनविण्याच्या प्रक्रियेत असलेला कच्चा माल असा सव्वाशे कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

खार येथील कार्टर रोड परिसरात दोघे एमडीचा मोठा साठा विकण्यासाठी येणार असल्याची खबर युनीट-9ला मिळाली होती. त्यानुसार एसीपी महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दया नायक तसेच सचिन पुराणिक, दीपक पवार, महेंद्र पाटील, प्राजक्ता धुमाळ, साधना सावंत व पथकाने कार्टर रोड परिसरात सापळा रचून राहुल आणि अतुल किसन गवळी अशा दोघा भावांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत पाच किलो एमडीचा साठा मिळून आला. इतक्या मोठय़ा प्रमाणात एमडी मिळाल्याने दया नायक व पथकाने दोघा भावांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा या भावांनी सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीत एक केमिकल फॅक्टरी थाटून तेथे एमडी बनवत असल्याची कबुली दिल्याचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी सांगितले.

राहुल आणि अतुल यांनी चिंचोली एमआयडीसीत एक प्रशस्त जागा भाडेतत्त्वावर घेऊन तेथे श्रीशेनकी नावाने केमिकल कंपनी थाटली होती. विशेष म्हणजे या दोघांशिवाय तेथे दुसरे कोणीही कामाला नव्हते. केवळ पार्ट टाईम दोघा वॉचमनची नेमणूक केली होती. कंपनीच्या तळमजल्यावर हे भामटे रसायनावर प्रक्रिया करीत असल्याचे भासवत होते. तर पहिल्या मजल्यावर त्यांनी तीन लॅबची सेटिंग केली होती. त्या लॅबमध्ये विविध रसायनांच्या माध्यमातून ते एमडी बनवत होते. फॅक्टरीतून विकण्यासाठी तयार झालेला एमडी व एमडी बनण्याच्या प्रक्रियेत असलेला 50 ते 60 किलो कच्चा माल असा सव्वाशे कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आठ महिन्यांपासून एमडीची निर्मिती
दहावीपर्यंत शिकलेल्या राहुल आणि अतुल यांनी दोन केमिकल कंपन्यांमध्ये यापूर्वी काम केले होते. त्यामुळे त्यांना केमिकलबाबत माहिती होती. ते काम सोडून दोघांनी स्वतःची कंपनी स्थापन केली आणि कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने एमडी बनविण्यास सुरुवात केली. अगदी छुप्या पद्धतीने ते एमडी बनवत होते. पण दया नायक व त्यांच्या पथकाने दोघांचा कारभार उद्ध्वस्त केला. आठ महिन्यांपूर्वी गवळी भावांनी एमडी बनवून विकण्यास सुरुवात केली होती.

डायरीतला फॉर्म्युला बघून जुळवाजुळव
ड्रग्ज बनविणाऱ्या गवळी बंधूंच्या त्या फॅक्टरीत पोलिसांच्या हाती एक डायरी लागली आहे. त्या डायरीत एमडी बनविण्याचा फॉर्म्युला आणि एमडी कोणाला विकायचे त्यांचे मोबाईल नंबर मिळाले आहेत. त्यामुळे लवकरच या आरोपींची साखळी मोडून काढण्यात येईल, असेही राजतिलक रोशन यांनी सांगितले. दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी या आरोपींनी मालाड आणि वर्सोवा येथे येऊन एमडी विकले होते, असेही तपासात समोर आले आहे.